कोयना जलाशय परिसरात पर्यटन विकासाचा मार्ग मोकळा, 47 कोटींचा निधी मंजूर
मुंबई : महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळख असलेल्या कोयना धरण (Koyna Dam) अर्थात शिवसागरच्या बॅकवॉटर परिसरात पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी शासकीय गुपिते कायदा 1923 (Government Secrets Act 1923) मध्ये आंशिक सुधारणा करण्यात आली आहे. या सुधारणेमुळे धरण आणि आजूबाजूचा 7 किमीचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून अबाधित ठेवण्यात येणार आहे. तर उर्वरित जलाशयाचा 80 किमीचा परिसर पर्यटनदृष्ट्या विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे सातारा जिल्हा जलपर्यटन क्षेत्रात मोठी झेप घेऊ शकेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केला आहे.
Indurikar Maharaj : इंदोरीकर महाराजांच्या घरात बिबट्या; कुत्र्यावर हल्ला करुन केली शिकार…
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, या निर्णयानुसार धरण क्षेत्राच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत धरण आणि आजूबाजूच्या सात किमीपर्यंतच्या क्षेत्राला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून अबाधित ठेवले आहे. तसेच 7 किमी नंतरच्या 2 किमीच्या क्षेत्राला बफर झोन म्हणून घोषित केले आहे. त्यापलीकडील जलाशयाचा विस्तार परिसर जल पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून जावळी तालुक्यातील मुनावळे येथे जागतिक दर्जाचे जल पर्यटन विकसित करण्याचे शासनाचे नियोजन आहे. त्यासाठी तब्बल 47 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
सातारा येथील शिवसागर अर्थात कोयना धरण य़ेथील जंगले, सह्याद्री डोंगराच्या रांगा, निळेशार पाणी, असं निसर्गाचं वरदान लाभलेलं आहे. शिवसागर जलाशयात जल पर्यटन विकसित करण्यासाठी मोठी संधी आहे. या शिवसागर धरणामध्ये जल पर्यटन विकसित झाल्यास महाबळेश्वर, पांचगणी, वाई, कास पठारावर येणारा पर्यटक शिवसागर जलाशयाकडे वळवता येईल. या माध्यमातून सातारा जिल्ह्यासाठी पर्यटकांची नवीन पर्यटन बाजारपेठ निर्माण होऊ शकणार आहे. यामुळे स्थानिक तरुणांना रोजगारची संधी निर्माण होईल. आणि स्थानिक अर्थव्यवस्था विकसित होऊ शकणार आहे. या प्रदेशाच्या शाश्वत आणि पर्यावरणावर आधारित विकासाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.