Nashik Graduate Constituency : जे झालं ते पक्षीय.., अखेर बाळासाहेब थोरातांनी मौन सोडलं

Nashik Graduate Constituency : जे झालं ते पक्षीय.., अखेर बाळासाहेब थोरातांनी मौन सोडलं

मुंबई : जे काही झालं आहे ते पक्षीय राजकारण असून मी माझं मत पक्षश्रेष्ठींना कळवलं असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी दिलीय. बाळासाहेब थोरात यांनी रुग्णालयातून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी आपले भाचे सत्यजित तांबे यांच्या विजयावर त्यांचं अभिनंदनही केलंय.

थोरात म्हणाले, मी गेल्या महिनाभरापासून रुग्णालयात होतो. माझ्या खांद्यावर शस्त्रक्रिया झाल्याने मला कार्यकर्त्यांपासून लांब रहावं लागलंय. आम्ही संघर्षातून नेहमीच यश मिळवलंय.

नाशिक विधानसभा मतदासंघातून अपक्ष निवडणूक लढवून सत्यजित तांबे चांगल्या मतांनी विजयी झाले आहेत, त्यामुळे त्यांचं अभिनंदन. गेल्या महिनाभरात ज्या काही घडामोडी घडल्या आहेत. त्या सर्व घडामोडींचं काही जण चुकीच्या पध्दतीनं राजकारण घडवून आणत होते, असा आरोप त्यांनी केला आहे.

तसेच जे झालं ते पक्षीय राजकारण आहे, मी माझं मत पक्षश्रेष्ठींना कळवलं असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय. दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या.

या मतदासंघातून काँग्रसे पक्षाकडून सुधीर तांबेंना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र तांबे पिता-पुत्राकडून सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीचा अपक्ष अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावरुन राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती.

अखेर निवडणुकीत भरघोस मतांनी विजय मिळवल्यानंतर स्वत: सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषद घेत जे काही घडलं त्याचा घटनाक्रम सांगितला होता. यावेळी सत्यजित तांबेंकडून मोठा गौप्यस्फोट करण्यात आला. आम्हांला चुकीचे एबी फॉर्म पाठवणाऱ्यांवर काँग्रेस काय कारवाई करणार? असा सवाल तांबेंकडून विचारण्यात आला.

एकंदरीत या संपूर्ण प्रकरणार सत्यजित तांबे यांचे मामा असलेले काँग्रेसचे बडे नेते बाळासाहेब थोरात यांची भूमिका काय असणार? याकडं सर्वांचच लक्ष लागून राहिलं होतं. अखेर बाळासाहेब थोरात यांनी काही जणांकडून चुकीच्या पध्दतीचं राजकारण केलं जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे जे झालं ते पक्षीय राजकारण असून मी माझं मत पक्षश्रेष्ठींना कळवलं असल्याचं थोरात यांनी स्पष्ट केलंय. बाळासाहेब थोरात यांच्या भूमिकेवरुन आता काँग्रेस नक्की कोणती भूमिका घेणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube