जिल्हाधिकाऱ्याच्या कानाखाली मारली अन् छावा संघटना चर्चेत; काय आहे या संघटनेचा इतिहास?

जिल्हाधिकाऱ्याच्या कानाखाली मारली अन् छावा संघटना चर्चेत; काय आहे या संघटनेचा इतिहास?

What Is History Chhawa Organization? : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या लातूर दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. (Chhawa) सुनील तटकरे यांची लातूरमध्ये पत्रकार परिषद सुरु असताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात निवेदन द्यायला आलेल्या काही कार्यकर्त्यांनी सुनील तटकरे यांच्यासमोर पत्ते फेकले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या सुरज चव्हणासह इतर पदाधिकाऱ्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. आता राज्यभरात ही संघटना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांतून उदयास आलेल्या अनेक मराठा संघटनांपैकी ‘छावा’ ही एक महत्त्वाची आणि कायमच चर्चेत राहिलेली संघटना आहे. 1990 मध्ये स्थापन झालेली ही संघटना, मराठा तरुणांना संघटित करून त्यांच्या हक्कांसाठी, विशेषतः आरक्षणासाठी सुरू करण्यात आली होती. ‘छावा’ची कार्यशैली आतापर्यंत कायम आक्रमक राहिली आहे. ज्या लातूरमध्ये ही संघटना जन्माला आली त्याच लातूरमध्ये ‘छावा’ संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण करण्यात आल्याने लातूर बंदची हाक देण्यात आली आहे. याशिवाय अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांविरोधात ही संघटना जास्तच आक्रमक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या संघटनेचा इतिहास काय आहे?

अण्णासाहेब जावळे हे या संघटनेचे संस्थापक. विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री असताना लातूरमध्येच एका जिल्हाधिकारी (IAS) अधिकाऱ्याच्या जावळे यांनी कानाखाली मारली होती. या घटनेमुळे छावा संघटनेचे नाव संपूर्ण महाराष्ट्राला कळाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सूरच चव्हाण यांनी लातूरमध्येच छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे यांना मारहाण केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे हे लातूरमध्ये आले असताना विजयकुमार घाडगे यांनी निषेध आंदोलन केलं होते. संदर्भ होता कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे विधीमंडळात रमी खेळत असल्याचा. विजयकुमार घाडगे यांनी तटकरेंच्या अंगावर पत्ते फेकून निषेध केला. त्यानंतर सूरज चव्हाण आणि त्यांच्या समर्थकांनी घाडगे यांना बेदम मारहाण केली.

छावा संघटनेच्या विजयकुमार घाडगे यांना मारहाण, लातूर बंद; सूरज चव्हाण यांचा माफीनामा

मराठा आरक्षण हा छावा संघटनेचा प्रमुख मुद्दा राहिला आहे. या प्रश्नांवर होणाऱ्या आंदोलनात छावा संघटनेने सातत्याने भाग घेतला आहे. मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षण मिळावं, ही या संघटनेची प्रमुख मागणी राहिली आहे. 2000 सालापासून आरक्षणाच्या मागणीसाठी छावा’ आणि इतर मराठा संघटना एकत्र येऊन सातत्याने आंदोलन करताना दिसत आल्या आहेत. 2023 मध्ये अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर त्या आंदोलनालाही छावा संघटनेने पाठिंबा दिला होता.

छावा संघटना ही आक्रमक दबावगट म्हणून काम करण्याचा प्रयत्न करत आली आहे. प्रशासन आणि शासनावर दबाव आणण्यासाठी रस्त्यावर उतरणे, मोर्चे काढणे आणि प्रसंगी कायदा हातात घेण्याचाही या संघटनेचे कार्यकर्ते प्रयत्न करतात. 2023 मध्ये धाराशिव येथे एका कर्नाटकच्या बसला आग लावण्यात आली होती असे सांगितले जाते. याशिवाय बीड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या घरावर हल्ला करण्यातही याच संघटनेचा हात असल्याचा आरोप केला जातो.

‘छावा’संघटनेने मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अनेकदा आंदोलने केली आहेत. लातूर, धाराशिव परिसरात या संघटनेचा आजही बऱ्यापैकी प्रभाव आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या असून, या निवडणुकांमध्ये जातीची समीकरणे ही खूप महत्त्वाची ठरतात. त्यामुळे घाडगे यांना झालेली मारहाण आणि त्यामुळे पुन्हा आक्रमक झालेली छावा संघटना यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससमोर नवी डोकेदुखी निर्माण झाली आहे. या मारहाणीमुळे अजित पवारांच्या पक्षाची प्रतिमा मराठा समाजामध्ये खालावण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube