शिंदेंचा ‘बाण’ अन् कडूंचा ‘प्रहार’; सत्तेत राहून शिंदे-कडू देणार राणांना शह; राजकीय डीलची खरी Story

Bacchu Kadu शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेऊन कडूंनी महायुतीच्या राजकारणात एक मोठी चाल खेळली आहे.

  • Written By: Published:
शिंदेंचा 'बाण' अन् कडूंचा 'प्रहार'; सत्तेत राहून शिंदे-कडू देणार राणांना शह; राजकीय डीलची खरी Story

Why didn’t Bachchu Kadu merge Prahar Paksha with Shiv Sena? : महाराष्ट्राच्या राजकारणात ‘रुस्तम-ए-हिंद’ अशी ओळख असलेले बच्चू कडू यांनी अखेर आपला राजकीय मार्ग स्पष्ट केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेऊन त्यांनी महायुतीच्या राजकारणात एक मोठी चाल खेळली आहे. मात्र, हा प्रवेश केवळ एक पक्षांतर नसून त्यामागे गुवाहाटीच्या बंडापासून ते मंत्रालयातील दालनापर्यंतची एक मोठी राजकीय मालिका दडलेली आहे. पण, कडूंनी त्यांचा प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन का केला नाही? यामागचं गणित काय? त्याबद्दल जाणून घेऊया…

1. गुवाहाटीचे ‘बॅकस्टेज’ राजकारण आणि निष्ठा :  2022 मध्ये जेव्हा एकनाथ शिंदे यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारविरुद्ध बंड केले, तेव्हा बच्चू कडू हे अपक्ष असूनही शिंदेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. सुरतपासून ते गुवाहाटीच्या ‘रॅडिसन ब्लू’ हॉटेलपर्यंत कडू शिंदेंच्या सोबत होते. त्यावेळी कडू यांनी आपल्यासोबत असलेल्या दोन-तीन आमदारांची ताकद शिंदेंच्या पारड्यात टाकली होती. शिंदे यांच्या गटाला ‘वैधता’ मिळवून देण्यात कडूंसारख्या आक्रमक आणि जनसामान्यांची नाळ असलेल्या नेत्याचा मोठा वाटा होता. तेव्हापासूनच शिंदे आणि कडू यांच्यात एक अतूट ‘राजकीय अंडरस्टँडिंग’ तयार झाली होती.

2. सत्तेत राहूनही ‘बंडखोर’ बाणा : बच्चू कडू यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी सत्तेची उब मिळताच आपले ‘आंदोलकाचे’ रूप सोडले नाही. मागील दोन वर्षांत त्यांनी अनेकदा सरकारला अडचणीत आणले आहे. यात शेतकऱ्यांसाठी ते रस्त्यावर उतरले अतिवृष्टीची मदत असो किंवा कांदा उत्पादकांचे अनुदान, कडू यांनी सत्तेत असूनही अमरावतीत हजारो कार्यकर्त्यांसह आंदोलने केली. याशिवाय दिव्यांगांच्या मागण्यांसाठी त्यांनी स्वतःच्याच सरकारच्या विरोधात मंत्रालयावर मोर्चा नेण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनांमागे एकच उद्देश होता— “मी सत्तेसाठी लाचार नाही, तर लोकांसाठी सत्तेत आहे,” हा संदेश मतदारांपर्यंत पोहोचवणे. आता शिवसेनेत प्रवेश करताना हीच प्रतिमा त्यांना मोठी ताकद देणार आहे.

3. ‘प्रहार’ विलीन का केला नाही? : बच्चू कडू यांनी शिवसेना (शिंदे गट) प्रवेशासाठी सर्वात मोठी अट हीच ठेवली की, ‘प्रहार जनशक्ती पक्ष’ आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवेल. यामगे दुहेरी खेळी आहे. एक म्हणजे कडू स्वतः शिवसेनेचे नेते म्हणून ओळखले जातील, ज्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात वजन मिळेल. मात्र, त्यांचे कार्यकर्ते ‘प्रहार’च्या बॅनरखालीच काम करतील. दुसरं म्हणजे बार्गेनिंग पॉवर जर, भविष्यात जागावाटपात किंवा धोरणात्मक निर्णयात शिवसेनेशी मतभेद झाले, तर कडूंकडे त्यांचा स्वतःचा पक्ष आणि चिन्ह (बॅट) पुन्हा सक्रिय करण्याचा पर्याय खुला असेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रहार ही केवळ संघटना नाही, तर तो एक विचार आहे. हा पक्ष विलीन केल्यास कट्टर कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली असती, जी कडू यांना परवडणारी नाही.

4. एकनाथ शिंदे आणि कडू यांच्यातील ‘फायनल डील’ : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कडू यांना पक्षात घेताना काही ‘शब्द’ दिले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यात अमरावती, अकोला आणि यवतमाळ पट्ट्यात शिवसेनेचा चेहरा म्हणून बच्चू कडू यांना प्रोजेक्ट केले जाईल असा शब्द देण्यात आल्याची चर्चा आहे. आतापर्यंत भाजपच्या काही नेत्यांच्या पाठिंब्यामुळे राणा दांपत्य कडूंकडे दुर्लक्ष करत होते. मात्र, कडू आता शिंदेंच्या शिवसेनेचे अधिकृत नेते झाल्यामुळे, त्यांना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडूनही सन्मानाची वागणूक मिळणे भाग पडेल. अमरावती जिल्ह्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांनी कडूंच्या रूपाने आपला ‘हुकुमी एक्का’ टाकला आहे. यामुळे राणा दांपत्याचे वर्चस्व कमी करून शिवसेनेची पाळेमुळे घट्ट करण्याचे शिंदे यांचे नियोजन आहे. भाजपने जरी राणांना पाठबळ दिले असले, तरी शिंदे यांच्याशी असलेल्या मैत्रीमुळे भाजपला आता कडूंच्या विरोधात आक्रमक भूमिका घेताना दहावेळा विचार करावा लागेल. त्याशिवाय कडू यांना केवळ मंत्रिपद नाही, तर लोकाभिमुख कामे करण्यासाठी मोठा निधी आणि अधिकार असलेले खाते (उदा. जलसंपदा, कृषी किंवा सार्वजनिक आरोग्य) देण्याचाही शब्द दिल्याची माहिती आहे.

5. कोणाला फायदा, कोणाला तोटा? : आता कडू शिवसेत प्रवेश करत असल्याचे फायदा आणि तोटा कुणाला आहे तर, फायदा शिंदेंना आणि कडू दोघांनाही आहे. कारण, कडूंच्या रूपाने शिवसेनेला विदर्भात एक आक्रमक नेता मिळाला आहे, जो थेट जनतेत जाऊन भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या व्होट बँकेला खिंडार पाडू शकतो. तर, अपक्ष किंवा छोट्या पक्षाचा नेता म्हणून असलेल्या मर्यादा संपून कडू यांना आता एका मोठ्या सत्ताधारी पक्षाचे ‘कवच’ लाभणार आहे. दुसरीकडे शिंदे कडूंच्या डिलाचा सर्वात जास्त तोटा विरोधकांना म्हणजेच महाविकास आघाडीला होऊ शकतो. कारण, आता विदर्भात केवळ भाजपशी नाही, तर कडूंसारख्या ‘ग्राउंड’वर काम करणाऱ्या नेत्याशी विरोधकांना लढावे लागेल.

follow us