कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे अन् प्रफुल्ल पटेल यांची निवड का? शरद पवारांनी सांगितलं कारण

कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे अन् प्रफुल्ल पटेल यांची निवड का? शरद पवारांनी सांगितलं कारण

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या वर्धापन दिनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठी घोषणा केली. पक्षात आता कार्यकारी अध्यक्ष हे पद निर्माण करण्यात आले असून या पदावर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि खासदार प्रफुल्ल पटेल (Prafful Patel) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन्ही कार्यकारी अध्यक्ष पक्षाचे प्रमुख या नात्याने काम करणार आहेत. (why Supriya Sule and Praful Patel elected as NCP working president Sharad Pawar told reason)

याशिवाय सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड, डॉ. योगेंद्र शास्त्री, के. के. शर्मा, पी. पी. मोहम्मद फैजल अशा नेत्यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी निवड करत त्यांच्याकडे मोठ्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. मात्र या राष्ट्रीय कार्यकारिणीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांची नावं नसल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. याशिवाय पक्षात दोन कार्यकारी अध्यक्ष का? आणि कार्यकारी अध्यक्षपदी या दोघांचीच निवड का करण्यात आली? याबाबतही प्रश्न विचारण्यात येत आहेत. यावर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत उत्तरं दिली आहेत.

पवार काय म्हणाले?

आगामी निवडणुकांना एक वर्ष शिल्लक आहे. आम्ही सगळे एकाच ठिकाणी पोहचू शकत नाही. एक कार्यकारी अध्यक्ष देखील एकावेळी सर्व ठिकाणी पोहचू शकत नाही. त्यामुळे मागील महिन्यांभरापासून आम्ही देशाच्या आकाराचा विचार करता एक नाही तर दोन कार्यकारी अध्यक्ष असावेत असा निर्णय घेतला. राहिला प्रश्न सुळे आणि पटेल यांच्या निवडीचा. तर याबाबत लोकांची मागणी होती की पटेल आणि सुळेंकडे जबाबदारी द्यावी. त्यानुसारच निर्णय झाला आहे. असं पवार यांनी स्पष्ट केलं.

अजित पवार नाराज आहेत वगैरे यात एका पैशाची पण सत्यता नाही. जयंत पाटील सध्या राज्यात प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्याकडे एक जबाबदारी आहे. अजित पवार हे महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्याकडेही एक जबाबदारी आहे. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे विशेष अशी जबाबदारी नव्हती. ते जबाबदारी स्वीकारण्यासाठी आणि वेळ देण्यासाठी उपलब्ध होते. त्यामुळे त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे कोणी नाराज आहे या गोष्टीत काहीही तथ्य नाही. मागच्या एका महिन्यापासून सर्वच वरिष्ठ नेत्यांनी या दोघांची नावं आमच्यापुढे ठेवली होती. त्याचा निर्णय आज झाला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube