सभागृहात तुमचेही आमदार, त्यांनाही चोर म्हणणार का? गुलाबराव पाटील आक्रमक
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधिमंडळ हे तर ‘चोर’मंडळ आहे, असं वक्तव्य केलं होतं. राऊतांच्या या वक्तव्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) तीव्र पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर लेट्सअप मराठीनं खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil)यांच्याशी विधानभवनात संवाद साधला त्यावेळी मंत्री पाटील म्हणाले की, या सभागृहाची एक प्रकारची गणिमा राहिलेली आहे. त्या सभागृहालाच चोर म्हणत असाल तर हा त्या पूर्ण मतदारांचा आणि महाराष्ट्राचा (Maharashtra)अपमान आहे. सभागृहाचा अपमान आहे, लोकशाहीचा अपमान आहे, त्याच सभागृहात तुमचेही आमदार आहेत मग त्यांनाही तुम्ही चोर म्हणणार का? असा सवाल राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलाय.
मंत्री पाटील म्हणाले की, सभागृहाच्या बाबतीत काही गोष्टी कशा बोलल्या पाहिजे याबाबत काही नियम आहेत. शेवटी महाराष्ट्राच्या जनतेनं प्रत्येक आमदाराला 4 लाख लोकांमधून निवडून दिलंय. मला तरी असं वाटतंय की, दोन दिवसानंतर सभागृहाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे निर्णय घेणार आहेत. मला असं वाटतंय की याच्यावर काहीना काही शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरुन अशा प्रकारे कोणीही सभागृहाच्या बाबतीत अशी वाच्यता करता कामा नये.
Sanjay Raut : हक्कभंग आणणे म्हणजे नक्की काय? संजय राऊत यांना काय शिक्षा होऊ शकते?
पत्रकारांनी प्रश्न केला की ज्याप्रमाणे संजय राऊत यांनी अपशब्द वापरले आहेत त्याचप्रमाणे संजय राऊत राऊत यांना शिवीगाळ केली त्यांना अपशब्द वापरले आहेत, तसा राज्यसभेत ते दावा करु शकतात, असं म्हटल्यावर मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, तो त्यांचा विषय आहे. राऊत यांनी या सभागृहाला चोर म्हणणं कितपत योग्य आहे.
ज्या सभागृहाच्या आमदारांच्या भरोश्यावर तुम्ही खासदार झालात, ज्या सभासदांनी तुम्हाला 41 मतं दिली, त्याच्यावर तुम्ही राज्यसभेमध्ये खासदार म्हणून निवडून गेलात, त्या सभासदांना तुम्ही चोर म्हणणार असाल, त्या सभागृहात तुमच्याही पक्षाचे आमदार आहेत, त्यांनाही तुम्ही चोर म्हणणार आहात का? असा सवालही यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केलाय.
ज्या पक्षाच्या आमदारांना तुमच्या नेत्यांनी तिकीट दिलं मग तेपण चोर आहेत का? मग या सर्व गोष्टी लांबपर्यंत जातात. मला तरी असं वाटतं की हा शब्द वापरणं चुकीचं आहे. याचा निर्णय आज होणं अपेक्षित होता पण तो परवावर गेलाय त्याबद्दल मंत्री पाटील म्हणाले की, मागच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की, आरआर आबांनी ज्यावेळेस दारुबंदीच्या बाबतीमध्ये, डान्सबारच्या बाबतीमध्ये विषय आणला होता, त्यावेळी शेट्टी म्हणून कोणीतरी मालक होते, त्यांना शिक्षा केली होती, आमची मागणी तीच आहे की अशा पद्धतीची शिक्षा दिली पाहिजे, असं यावेळी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलंय.