200 पेक्षा अधिक आक्षेपार्ह व्हिडीओ सापडले; अल्पवयीन मुलांच्या लैंगिक शोषणप्रकरणी तरुणाला अटक

आरोपी पीडित मुलांचे अश्लील व्हिडीओ तयार करून ते समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देत त्यांना ब्लॅकमेल करत असल्याचे तपासात उघड.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design (1)

Youth arrested for sexual abuse : नंदुरबार जिल्ह्यात अल्पवयीन मुलांसह तरुणांवर लैंगिक अत्याचार करून त्यांचे अश्लील व्हिडीओ आणि छायाचित्रे तयार करणाऱ्या एका 22 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून मुलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे आरोपी पीडित मुलांचे अश्लील व्हिडीओ तयार करून ते समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देत त्यांना ब्लॅकमेल करत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपीने 2022 पासून ते 6 ऑगस्ट 2026 पर्यंत अनेक अल्पवयीन मुलांबरोबर तसेच काही तरुणांबरोबर लैंगिक अत्याचार केल्याचा संशय आहे. आरोपी पीडितांना विविध आमिषे दाखवत किंवा विश्वासात घेऊन त्यांचे अश्लील व्हिडीओ आणि छायाचित्रे तयार करत होता. त्यानंतर हे व्हिडीओ सार्वजनिक करण्याची धमकी देत त्यांच्यावर मानसिक दबाव टाकला जात असल्याची माहिती समोर आली आहे.

या गंभीर प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांनी आरोपीचा मोबाईल जप्त केला. प्राथमिक तपासात मोबाईलमध्ये तब्बल 200 हून अधिक आक्षेपार्ह आणि अश्लील व्हिडीओ आढळून आले आहेत. या सर्व डिजिटल पुराव्यांची सध्या फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून सखोल तपासणी केली जात आहे. या व्हिडीओंमधून आणखी पीडितांची माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

राज्यातील रक्तकेंद्रांवर एफडीएची कडक नजर; नियमांचे पालन बंधनकारक, उल्लंघन केल्यास कठोर कारवाई

या प्रकरणी आरोपीविरोधात पोक्सो कायदा, बालकांची काळजी व संरक्षण कायदा तसेच इतर संबंधित कलमांनुसार गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून पुढील चौकशीसाठी त्याची पोलीस कोठडी मिळविण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून संभाव्य पीडितांची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

आरोपीच्या संपर्कात आणखी कोण व्यक्ती होत्या, या प्रकारात इतर कोणी सहभागी होते का, तसेच अश्लील साहित्याचा वापर किंवा प्रसार इतर माध्यमांतून करण्यात आला होता का, याचाही तपास केला जात आहे. दरम्यान, कथित ध्वनीफित प्रकरणांनंतर नंदुरबार जिल्ह्यात समोर आलेल्या या नव्या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेसंदर्भात पालकांनी अधिक जागरूक राहण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत असून समाजमाध्यमे आणि डिजिटल माध्यमांचा गैरवापर करून होणाऱ्या गुन्ह्यांबाबत चिंता वाढली आहे.

या प्रकरणातील तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी नाकारलेली नाही. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आता या तपासाकडे लागले आहे.

follow us