Sanjay Raut यांना बेळगाव कोर्टाचा दिलासा ! अटकपूर्व जामीन मंजूर
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना बेळगाव न्यायालयाने (Belgaon Court) अटकपूर्व जामीन (Bail) मंजूर केल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला. त्यांना जिल्हा सत्र न्यायाधीश मुस्तफा हुसेन यांनी हा जामीन मंजूर केला. ज्येष्ठ वकील शामसुंदर पत्तार, मारुती कामाणाचे, शंकर बाळ नाईक आणि हेमराज बेंचण्णवर यांनी संजय राऊत यांच्या वतीने काम पाहिले.
30 मार्च 2018 रोजी बेळगावात (Belgaon) झालेल्या कार्यक्रमात संजय राऊत यांनी भाषण केले होते. संजय राऊत यांनी भाषण करुन दोन भाषिक गटात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप ठेवून टिळक वाडी पोलीस (Tilak Wadi Police) स्थानकात संजय राऊत यांच्यावर 153 अ कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यानंतर पोलिसांनी जेएमएफसी चौथ्या न्यायालयात दोषारोप पत्र संजय राऊत यांच्यावर दाखल केले होते. यानंतर न्यायालयाने संजय राऊत यांना न्यायालयात तारखेला हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते, पण संजय राऊत सुनावणीला हजर राहिले नव्हते. संजय राऊत यांनी अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून अर्ज केला होता. त्यावर आज बेळगाव सत्र न्यायालयात सुनावणी झाली आणि त्यांचा अर्ज मंजूर करण्यात आला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे संजय राऊत मोठा दिलासा मिळाला.