मुंबईतील खवय्यामुळे ‘स्विगी’ मालामाल : एकाच पत्त्यावर तब्बल 42 लाखांच्या फूड ऑर्डरची डिलिव्हरी

मुंबईतील खवय्यामुळे ‘स्विगी’ मालामाल : एकाच पत्त्यावर तब्बल 42 लाखांच्या फूड ऑर्डरची डिलिव्हरी

मुंबई : खवय्यांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात विविध प्रकारचे खाण्याचे शौकीन आढळून येतात. असाच एक खवय्या मुंबईत सापडला आहे. ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीवर मुंबईतील एका खवय्याने यावर्षी 42.3 लाख रुपयांची ऑर्डर दिल्याचे समोर आले आहे. स्विगीने आपल्या वार्षिक अहवाल ‘How India Swiggy’d in 2023’ मध्ये याबाबतचा उल्लेख केला आहे. याशिवाय चेन्नई, दिल्ली आणि हैदराबादमधून स्विगीला 10,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या सर्वाधिक ऑर्डर्स मिळाल्या होत्या. (A resident of Mumbai ordered food worth Rs 42.3 lakh from Swiggy in 2023)

बिर्याणी ठरली खवय्यांची पहिली पसंती :

सलग आठव्या वर्षी स्विगीवर सर्वाधिक ऑर्डर केलेली डिश म्हणून बिर्याणी शीर्षस्थानी आहे. 2023 मध्ये प्रति सेकंद बिर्याणीच्या 2.5 ऑर्डर मिळाल्या. यात चिकन बिर्याणीची ऑर्डर शाकाहारी बिर्याणीच्या 5.5 पट होती. स्विगीने दिलेल्या माहितीनुसारस तब्बल 40,30,827 वेळा बिर्याणी सर्च करण्यात आली. हाय-व्होल्टेज भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्यादरम्यान बिर्याणीची क्रेझ शिगेला पोहोचली होती. यातही चंदीगडमध्ये एका कुटुंबाने एकाच वेळी 70 प्लेट्सची ऑर्डर दिली होती.

बिर्याणीच्या ऑर्डरपैकी प्रत्येक सहावी बिर्याणीची ऑर्डर हैदराबादमधून दिली मिळाली होती. याच हैदराबादमधील एक वापरकर्ता बिर्याणीचा चॅम्पियनही ठरला आहे. या वापरकर्त्याने दररोज सरासरी चार या हिशोबाप्रमाणे वर्षभरात तब्बल 1,633 बिर्याणी ऑर्डर केल्या होत्या.

दरम्यान, जयपूरमधील एका वापरकर्त्याने स्विगी इंस्टामार्टवर एकाच दिवसात 67 ऑर्डर दिल्या. याशिवाय सर्वात मोठी सिंगल ऑर्डर 31,748 रुपयांची होती. या वापरकर्त्याने कॉफी, ज्यूस, कुकीज, नाचो आणि चिप्स यांची ऑर्डर दिली होती.

व्हॅलेंटाईन डेला प्रति मिनिट 271 केक ऑर्डर :

स्विगीच्या अहवालानुसार, दुर्गापूजेदरम्यान गुलाब जामच्या 77 लाखांहून अधिक ऑर्डर्स मिळाल्या होत्या. तर गरब्यासोबतच नवरात्रीच्या सर्व नऊ दिवसांच्या शाकाहारी ऑर्डरमध्ये मसाला डोसा हा सर्वाधिक ऑर्डर केलेला पदार्थ होता. हैदराबादमधील एका वापरकर्त्याने 6 लाख रुपयांच्या इडलीचीही ऑर्डर दिली होती. प्रत्येकाच्या आवडत्या चॉकलेट केकची बंगळुरुमधून 85 तब्बल लाख ऑर्डर्स स्विगीला मिळाल्या. 2023 च्या व्हॅलेंटाईन डे दिवशी भारताने प्रति मिनिट 271 केक ऑर्डर करण्यात आले. यामुळे कंपनीकडून आता बेंगळुरूला ‘केक कॅपिटल’ म्हणून गौरवण्यात आले आहे.

वापरलेली इलेक्ट्रिक वाहने :

यावर्षी, स्विगीच्या डिलिव्हरी पार्टनर्सने इलेक्ट्रिक वाहने आणि सायकलींचा वापर करून 166.42 कोटी किलोमीटरचे अंतर पार केले, यामुळे पर्यावरणपूरक वितरण व्यवस्था उभी राहण्यासाठी मदत झाली आहे. चेन्नई येथील वेंकटसेन आणि कोची येथील संथिनी या डिलिव्हरी पार्टनर्सने अनुक्रमे 10,360 आणि 6,253 ऑर्डर वितरित केल्या. अतिरिक्त अंतक पार करून, एका स्विगी डिलिव्हरी पार्टनरने फास्ट फूड वितरीत करण्यासाठी 45.5 किमी प्रवास केला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube