गणपत गायकवाड अन् महेश गायकवाड यांच्या वादात राहुल पाटलांवर फायरिंग, पण का?

गणपत गायकवाड अन् महेश गायकवाड यांच्या वादात राहुल पाटलांवर फायरिंग, पण का?

मागच्या तीन दिवसांपासून राज्यात दोन गायकवाडांची चर्चा आहे. एक भाजप आमदार गणपत गायकवाड  (Gantap Gaikwad) यांची. ज्यांनी थेट उल्हासनगरच्या पोलीस स्टेशनमध्येच फायरिंग केली आणि दुसरे महेश गायकवाड (Mahesh Gaikwad). ज्यांच्यावर फायरिंग झाली. जमिनीच्या वादातून ही घटना घडल्याचे सांगितलं जात आहे. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. एक सत्ताधारी पक्षाचा आमदार, ते देखील पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार करतो आणि त्यानंतर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर आरोप करतो या घटनाक्रमाने भाजपचेही नेते सुन्न झाले आहेत. (Along with Mahesh Gaikwad, Ganpat Gaikwad also fired at Rahul Patil at that time, but why exactly)

या दोन गायकवाडांमध्ये आणखी एका नावाची चर्चा आहे. हे नाव म्हणजे कल्याणचे बैलगाडा मालक राहुल पाटील. महेश गायकवाड यांच्यासोबत त्यावेळी गणपत गायकवाड यांनी राहुल पाटलांवरही गोळीबार केला. त्यांना दोन गोळ्या लागल्या. त्यांच्यावरही सध्या महेश गायकवाड यांच्यासोबत रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राहुल पाटील यांच्यावर वर्षाच्या अंतरात झालेला हा दुसरा गोळीबार ठरला आहे. पण दोन गायकवाड्यांच्या वादात राहुल पाटील यांच्यावर का गोळीबार झाला? राहुल पाटील नेमके कोण आहेत? त्यांचा आणि महेश गायकवाड यांचा काय संबंध? असा सवाल विचारला जातोय. याच सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण पाहु.

राहुल पाटील यांच्यावरील पहिला गोळीबार :

राहुल पाटील यांच्यावर झालेल्या दुसऱ्या गोळीबाराच्या घटनेला पहिल्या गोळीबाराच्या वादाचीही किनार आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके आणि कल्याणचे बैलगाडा मालक राहुल पाटील यांच्यात जोरदार वाद झाला होता. फडके यांनी पाटील यांच्या ताफ्यावर अंदाधुंद गोळीबार केला होता. यानंतर पंढरीनाथ फडके यांच्यासह एकूण 32 जणांवर हत्येचा प्रयत्न आणि भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पालघर या पट्ट्यात बैलगाडा शर्यत म्हटले की पंढरीशेठ फडके यांचे नाव येतेच. गळ्यात किलोभर सोने, कमरेला लटकवलेले पिस्तुल, पायात पांढरी कोल्हापुरी, महागड्या गाड्या, किरकोळ शरीरयष्टी असे पंढरीनाथ फडकेंचे वर्णन करता येईल. खरेतर त्यांच्या आजोबांपासून त्यांच्या घरात बैलगाडा शर्यतीचा शौक केला जातो. महाराष्ट्रभर ज्या बैलगाडा शर्यती होतात त्यातील जिंकणाऱ्या बैलांना विकत घेऊन सांभाळण्याचे काम फडके करतात.

‘राज्यात गुंडाराज, संबंधित मंत्र्यांनी राजीनामा द्यावा’, प्रकाश आंबेडकरांची फडणवीसांवर टीका

राहुल पाटीलही याच बैलगाडा शर्यतीमधील दुसरे मोठे नाव. त्यांच्याही गळ्यात किलोभर सोने, भारदार शरीरयष्टी आणि बोलण्यातील रुबाब असतो. राहुल पाटील यांच्याकडील मथूर बैलाने फडकेंच्या बैलांना गेल्या काही दिवसात सातत्याने अस्मान दाखवले आहे. त्यामुळे पंढरीनाथ फडके आणि राहुल पाटील यांच्यातून विस्तव जात नव्हता. अशातच राज्यात बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यासंदर्भात एक बैठक बोलावण्यात आली होती.

पंढरीनाथ फडके आणि राहुल पाटील या बैठकीसाठी निघालेले असताना अंबरनाथजवळ दोन्ही गट एकमेकांसमोर आले. त्यांच्यातील शाब्दिक बाचाबाचीतून पंढरीनाथ फडकेंचा चालक एकनाथ फडके याने आपल्याकडील बंदुकीतून राहुल पाटील यांच्या ताफ्यावर अंदाधुंद गोळीबार केला. नंतर पाटील यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिसांनी फडकेंविरोधात गुन्हा दाखल केला. त्याच रात्री विहेगर गावातून पंढरी फडके, एकनाथ फडके आणि हरिशचंद्र फडके या तीन आरोपींना अटक करत त्यांचे रिव्हॉल्वरही जप्त करण्यात आले.

कल्याण-डोंबिवलीचे राजकारण :

सुरुवातीला दोन बैलगाडा मालकांमधील हा वाद झाला असे त्याचे स्वरुप होते. पण पोलीस तपासात या घटनेमागे कल्याण-डोंबिवलीचे राजकारणही समोर यायला सुरुवात झाली. कल्याण-डोंबिवली महापालिकेत कुणाल पाटील हे अपक्ष नगरसेवक होते. ज्या वॉर्डातून कुणाल पाटील निवडणूक लढवत होते, त्याच वॉर्डातून राहुल पाटील हेही निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यातूनच त्यांनी दोन वर्षांपूर्वी शिंदे गटातही प्रवेश केला होता.

पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार अन् दिल्लावाल्यांना महाराष्ट्राचं पाणी…; उद्धव ठाकरेंचा इशारा

याच कुणाल पाटील यांची पंढरीनाथ फडकेंशी खास मैत्री आहे. या मैत्रीखातर पंढरीनाथ फडकेंनी “तुला जिवे ठार मारून, आज तुझं मयत इथेच टाकणार, मग तू निवडणुकीला कसा निवडून येशील?”, असे म्हणत राहुल पाटील आणि त्यांच्या साथीदारांच्या दिशेने पिस्तूल, रिवॉल्व्हर, डबल बोअर बंदूकीतून गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला. या आरोपांमुळे या घटनेला कुणाल पाटील विरुद्ध राहुल पाटील यांच्यातील वादाला राजकारणाची किनार मिळाली.

महेश गायकवाड हे श्रीकांत शिंदेंचे राईट हॅन्ड, तर राहुल पाटील हे महेश गायकवाड यांचे राईट हॅन्ड :

याच महापालिका निवडणुकीच्या राजकारणात उतरण्यासाठी राहुल पाटील आडीवली ढोकली गावच्या राजकारणातून कल्याणमध्ये अॅक्टिव्ह झाले. राहुल पाटील हे महेश गायकवाड यांना त्यांचे राजकीय गुरु मानतात. महेश गायकवाड हे श्रीकांत शिंदे यांचे जवळचे आणि विश्वासातील कार्यकर्ते. अगदी राईट हॅन्डच. तर राहुल पाटील हे महेश गायकवाड यांचे राईट हॅन्ड. खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशीही राहुल पाटील यांचे चांगले संबंध आहेत. मागील काही दिवसांपूर्वी श्रीकांत शिंदे यांच्या खासदार केसरी या बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. त्याची सगळी सुत्रे राहुल पाटील यांच्याकडेच होती.

आताही गणपत गायकवाड यांच्याशी वाद मिटविण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जाताना महेश गायकवाड यांनी राहुल पाटील यांनाही त्यांच्यासोबत घेतले होते. पोलीस स्टेशनबाहेर ज्या कथित धक्काबुक्कीचा उल्लेख गणपत गायकवाड करतात, त्यातही राहुल पाटील होते अशी चर्चा आहे. राहुल पाटील आणि महेश गायकवाड यांच्यातील याच संबंधांमधून गणपत गायकवाड यांनी त्यांच्यावरही गोळीबार केला असावा अशी चर्चा सध्या सुरु आहे. आता नेमके खरे खोटे पोलीस तपासात समोर येईलच. पण दुसऱ्यांदा गोळीबार झाल्याने राहुल पाटील यांचे कुटुंबीय सध्या कमालीचे चिंतेत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube