अनिल देशमुखांची आज सुटका होणार, बाईक रॅलीचं आयोजन

Clipboard   December 28, 2022 7_39 AM

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज तुरुंगातून बाहेर येणार आहेत. 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी त्यांना अटक केलेली होती. तब्बल 1 वर्ष 1 महिना आणि 26 दिवसांनी अनिल देशमुख तुरुंगाबाहेर येणार आहेत. त्यांच्या जामिनाची स्थगिती वाढवण्याची सीबीआयची मागणी मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळल्यानं देशमुखांचा बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. देशमुख बाहेर आल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आर्थर रोड जेल ते सिद्धिविनायक मंदिर पर्यंत बाईक रॅली काढण्यात येणार आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दरमहा 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणी सीबीआयनं प्राथमिक चौकशीनंतर अनिल देशमुखांसह अन्य काही जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

पुढे या प्रकरणानं अनेक छोटी मोठी वळणं घेतली. परमबीर सिंहांनी लेटर बॉम्ब टाकला होता. आता या प्रकरणाची सुनावणी मुंबई सत्र न्यायालयात सुरू आहे. 1 नोव्हेंबर 2021 ईडी चौकशीसाठी गेलेल्या अनिल देशमुखांना ईडीनं अटक केली होती. ईडीनं देशमुखांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला. ईडीनं अटक केल्यानंतर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सीबीआयकडूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यामुळं देशमुख एकाच वेळी दोन तपास यंत्रणांकडून दोन गुन्ह्यांप्रकरणी अटकेत होते.

राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांना मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिलाय. त्यांच्या जामीनाच्या स्थगितीला मुदत वाढवून देण्याच्या सीबीआयची मागणी कोर्टानं फेटाळली आहे. मुंबई उच्च न्यायालयानं देशमुखांच्या जामीनाला दिलेली वाढीव स्थगिती संपली आहे.

याबाबत सीबीआयनं जामीनाला मुदतवाढ मिळण्यासाठी केलेल्या याचिकेबाबत मंगळवारी उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईपर्यंत अनिल देशमुखांच्या जामिनावरची स्थगिती वाढवण्याची मागणी सीबीआयकडून करण्यात आली होती. जामिनाची स्थगिती वाढवण्याची सीबीआयची मागणी उच्च न्यायालयानं फेटाळली. त्यामुळं आज अनिल देशमुखांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

Tags

follow us