वरळीतून लढा, असं आव्हान Aaditya Thackeray यांनी देताच मुख्यमंत्र्यांची वेगळीच खेळी

वरळीतून लढा, असं आव्हान Aaditya Thackeray यांनी देताच मुख्यमंत्र्यांची वेगळीच खेळी

मुंबई : मुंबईत उध्दव ठाकरे गटाला पुन्हा एक धक्का बसला आहे. वरळी मतदारसंघातील माजी नगरसेविका मानसी दळवी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात सामील झाल्या आहेत.

वरळी मतदारसंघातील माजी नगरसेविका मानसी दळवी यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला आहे. प्रवेशादरम्यान त्यांनी हातात भगवा झेंडा घेतला आहे. मी राजीनामा देतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राजीनामा द्यावा, आणि वरळीत माझ्याविरोधात उभे राहून निवडणूक लढावी, असं खुलं आव्हान आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिलं होतं.

आदित्य ठाकरेंकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार निवडणुका घेण्यासाठी आव्हान दिलं जातंय. तसेच जेवढे खोके वाटायचे ते वाटा मात्र, एकही मत विकलं जाणार नाही, असंही आदित्य ठाकरे म्हणाले होते. अशातच मानसी दळवी यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगलीय.

मानसी दळवी मुंबईत गेल्या अनेक वर्षांपासून उध्दव ठाकरे गटाच्या शिवसेनेत कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक सामाजिक आंदोलनात सहभाग घेतला. वरळी परिसरांत शिवसेनेच्या एकनिष्ठ नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे.

महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर मानसी दळवी राजकारणात अधिक सक्रिय असल्याचं दिसून आलं नव्हतं. आता मात्र, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केल्याने दळवी पुन्हा एकदा शिंदे गटातून महापालिका निवडणुका लढवणार असल्याचं चित्र स्पष्ट झालंय.

यावेळी आमदार भरतशेठ गोगावले, सचिव संजय म्हशीलकर, प्रवक्ते किरण पावसकर, समन्वयक आशिष कुलकर्णी, प्रवक्त्या शीतल म्हात्रे, माजी नगरसेवक संतोष खरात आणि वरळी विधानसभेतील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube