मुंबईकरांनो लक्ष द्या! BKC मध्ये दर शुक्रवारी कार, बाईकवर बंदी, मेट्रो-बसने प्रवासाचे आवाहन
BKC मध्ये दर शुक्रवारी ‘साप्ताहिक सार्वजनिक वाहतूक दिन’ पाळला जाणार असून कर्मचाऱ्यांना खासगी कार, दुचाकीऐवजी मेट्रोने प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
BKC : मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल परिसरात काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन प्रवासात मोठा बदल घडवून आणण्यासाठी एमएमआरडीएने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता BKC मध्ये दर शुक्रवारी ‘साप्ताहिक सार्वजनिक वाहतूक दिन’ पाळला जाणार असून कर्मचाऱ्यांना खासगी कार आणि दुचाकीऐवजी मेट्रो, लोकल, बेस्ट बस आणि इतर सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एमएमआरडीए आणि World Resources Institute India यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाची घोषणा करण्यात आली. भारतातील कोणत्याही प्रमुख व्यावसायिक केंद्रात अशा प्रकारचा साप्ताहिक सार्वजनिक वाहतूक दिन राबविण्याचा हा पहिलाच प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे.
मोदींची तपपूर्ती! नेहरूंचा विक्रम मोडला? जाणून घ्या दोन्ही पंतप्रधानांच्या कार्यकाळाची कहाणी
देशातील महत्त्वाच्या व्यावसायिक केंद्रांपैकी एक असलेल्या BKCमध्ये सुमारे दोन लाख कर्मचारी कार्यरत आहेत. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये येथे असल्याने दररोज हजारो नागरिक या भागात ये-जा करतात. मात्र, अभ्यासानुसार BKCमध्ये येणाऱ्या ५२ टक्के प्रवाशांचा कल अजूनही खासगी वाहने, टॅक्सी आणि रिक्षांकडे असल्याचे दिसून आले आहे. तर केवळ २५ टक्के प्रवासी नियमितपणे सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतात.
BKC परिसरात वाढती वाहतूक कोंडी, पार्किंगची समस्या आणि प्रदूषण ही मोठी आव्हाने बनली आहेत. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवून रस्त्यांवरील वाहनांची संख्या कमी करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे. सर्वेक्षणानुसार, सार्वजनिक वाहतूक अधिक सोयीस्कर आणि विश्वासार्ह झाल्यास तब्बल ८२ टक्के नागरिक ती स्वीकारण्यास तयार आहेत.
Pune Accident : नवले पुलाजवळ भीषण अपघात; डिलिव्हरी बॉयचा मृत्यू, ४ जण गंभीर जखमी…
अलीकडेच सुरू झालेल्या मेट्रो सेवेमुळे BKC परिसरातील कनेक्टिव्हिटीमध्ये मोठी सुधारणा झाली आहे. आगामी काळात आणखी मेट्रो मार्गिका सुरू झाल्यानंतर BKCचा बहुतांश भाग मेट्रो स्थानकांशी जोडला जाणार आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, फीडर बस सेवा मजबूत करणे, पादचारी सुविधा सुधारणे, वाहतूक केंद्रांजवळ अधिक सुविधा उपलब्ध करून देणे आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणे अशा उपाययोजनांवरही भर दिला जाणार आहे. या उपक्रमामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास, प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यास आणि अधिक स्वच्छ व शाश्वत शहरे उभारण्यास मदत होईल, असा विश्वास एमएमआरडीएकडून व्यक्त करण्यात आला आहे.