Arvind Kejriwal : पक्ष आणि नाव चोरलं… तरीही उद्धव ठाकरे वाघच

Arvind Kejriwal : पक्ष आणि नाव चोरलं… तरीही उद्धव ठाकरे वाघच

मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मुंबईत भेट घेतली. सर्वोच्च न्यायालय उद्धव ठाकरे यांना न्याय देईल अशी अपेक्षा अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केली.

उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवसस्थानी या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी उद्धव यांची भेट घेतली. या भेटीनंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केजरीवाल यांनी उद्धव ठाकरेंच्या हातून पक्ष आणि चिन्ह गेल्याच्या मुद्द्याबरोबरच सीबीआय, ईडीचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपावर टीका केली आहे.

उद्धव ठाकरेंच्या पक्षाची चोरी झाली, त्यांच्या चिन्हाची आणि नावाची चोरी झाली, पण बाळासाहेब ठाकरे हे वाघ होते, आणि उद्धव ठाकरे हे त्या वाघाचे सुपुत्र आहेत, त्यामुळे महाराष्ट्र त्यांच्या मागे असल्याचं मत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केलं.

CM Eknatha Shinde छत्रपती संभाजीनगर, धाराशिव नामांतर ऐतिहासिक पाऊल

ईडी आणि सीबीआयचा वापर हे भित्रे लोक करतात. भाजपवाले ज्या लोकांना घाबरतात त्यांच्याविरोधात या तपास यंत्रणांचा वापर केला जातोय. आम्ही काही केलं नाही, त्यामुळे आम्ही घाबरत नाही, शेवटी सत्याचाच विजय होणार असं अरविंद केजरीवाल म्हणाले.

भाजपला गुंडगिरीशिवाय काही येत नाही, यामुळे देश पुढे जाणार नाही. दिल्लीतील जनतेनं आम्हाला बहुमत दिलं, तरीही दिल्लीत महापौर बसवायला आम्हाला सर्वोच्च न्यायालयात जावं लागलं असं केजरीवाल म्हणाले. या देशात एकच पक्ष आहे जो 24 तास निवडणुकीबद्दल विचार करतो असं सांगत केजरीवाल यांनी भाजपला टोला लगावला. आम्ही देशाच्या विकासाच्या मुद्द्यांवर विचार करतो असंही ते म्हणाले.

कोरोना काळात उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी ज्या प्रकारे काम केलं ते कौतुकास्पद आहे. कोरोना काळात महाराष्ट्र आणि मुंबईतील अनेक कामांची दिल्लीमध्ये आम्ही अंमलबजावणी केली असं अरविंद केजरीवाल म्हणाले. ते म्हणाले की, आज लोकांना नोकऱ्या नाहीत, युवक बेरोजगार आहेत, याचवेळी देशातील महागाई वाढत आहे. एलआयसीसारखी कंपनी तोट्यात जोत आहे. देशातील काही उद्योगपतींना फायदा करुन देण्यासाठी केंद्र सरकार देशाला विकायला निघालंय.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी बलिदान दिलं. त्यामुळे आता आपली जबाबदारी वाढली आहे. आता या देशामध्ये लूटालूट सुरू आहे. ती थांबली पाहिजे. त्यामुळे हे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवे. प्रत्येक घरांत चूल पेटली पाहिजे, प्रत्येक घरांत अन्नधान्य पोहचल पाहिजे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube