‘अंगारकी’निमित्त श्रीमंत दगडूशेठ गणपती दर्शनाला अलोट गर्दी
पुणे : आज अंगारकी चतुर्थीच्या निमित्तानं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पहाटेपासूनच गणेश भक्तांची दर्शनासाठी रांग लागली आहे. नवीन वर्षातील पहिलीच अंगारकी चतुर्थी असल्यानं गणेशाच्या दर्षणाकरता भाविकांनी गर्दी पाहायला मिळतेय.
आज अंगारकीनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरास विविध प्रकारच्या फुलांची आरास करण्यात आलीय. दगडूशेठ गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीनं मंदिरात स्वराभिषेक आयोजित करण्यात आलाय.
पहाटे 4 ते सकाळी 6 यावेळेत प्रसिद्ध गायक जितेंद्र अभ्यंकर आणि गायिका भाग्यश्री अभ्यंकर यांनी श्रीं चरणी स्वराभिषेक अर्पण केला. स्वराभिषेकातून प्रसिद्ध भक्ती गीतांच्या गाण्यांची पर्वणी पुणेकरांना मिळाली.
संकष्टी चतुर्थीचा उपवास पश्चिम आणि दक्षिण भारतात विशेषतः महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये पाळला जातो. संकष्ट चतुर्थी हे एक व्रत आहे. हे व्रत कोणीही करू शकतं. हे व्रत दोन प्रकारांनी करतात. मिठाची संकष्ट चतुर्थी व पंचामृती चतुर्थी. या व्रतात दिवसभर उपवास करावा लागतो. उपवासानंतर चंद्रोदय झाल्यावर चंद्राला व गणपतीला महानैवेद्य दाखवून त्यानंतरच जेवण करावं, अशी या उपवासामागं आणि दिवसामागं कथा सांगितली जाते.