पुण्यातील पोटनिवडणुकीचा निर्णय योग्य वेळी, अजित पवार यांची भूमिका
पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन ठिकाणच्या निवडणुका निवडणूक आयोगाला जेव्हा वाटेल तेव्हा त्या लावल्या जातील. पण निवडणुकामध्ये उमेदवार द्यायचे कि नाही याबाबत त्या त्या वेळेची परिस्थिती बघून आम्ही योग्य निर्णय घेऊ, अशी भूमिका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेतली आहे
अजित पवार दोन दिवस पुणे-पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते माध्यमांशी बोलताना पुणे आणि पिंपरीच्या पोटनिवडणुकीसंदर्भात बोलताना ते म्हणाले की मागच्या काळात बऱ्याच प्रकारे राजकीय बदल झाले आहेत. यापूर्वी पुण्याची जागा काँग्रेसकडून तर पिंपरीची जागा राष्ट्रवादीकडून पुरस्कृत केली गेली होती. त्यामुळे पोटनिवडणुका जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्याची बैठक होईल आणि यामध्ये योग्य तो निर्णय घेतला जाईल. अशी भूमिका त्यांनी घेतली.
नामांतराच्या भूमिकेवर पुणेकरांच्या भूमिकेचा विचार व्हावा
गेल्या काही दिवसापासून अधून मधून पुणे शहराचे नाव बदलून जिजाऊ नगर करावे अशी मागणी केली जात आहे. दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही अशी मागणी करत, हा मुद्दा आगामी अधिवेशनात उपस्थित करणार आहे, असे सांगितले आहे. यावर बोलताना अजित पवार यांनी मूळ पुणेकरांच्या मताचा विचार व्हावा अशी भूमिका घेतली.
यावर बोलताना अजित पवार म्हणाले की राज्यात महागाई आणि बेरोजगारीच्या प्रश्न ऐरणीवर आला असताना, पुणे शहराच्या नामांतराचा विषय उकरून काढण योग्य होणार नाही. आणि पुणे काय आता एकट्या दुकट्याचे राहिले नाही. त्यात नामांतरांचा विषय हा संवेदनशील असतो. त्यातही नामांतराचा विषय पुढे येत असताना मूळ पुणेकरांच्या मताचा देखील विचार व्हायला हवा.