BMC : मुंबई पालिकेच्या खजिन्यावर ‘डोळा’, तब्बल ९२ हजार कोटींच्या ठेवी
प्रफुल्ल साळुंखे, विशेष प्रतिनिधी
Mumbai Municipal Corporation: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यात मुंबई महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. विविध विकासकामे करायची असतील तर दिल्ली ते मुंबई पर्यंत एका विचाराचे सरकार असावे अशा शब्दात त्यांनी जनतेला आवाहन केलं. या भाषणात त्यांनी पैसे साठवून काय करणार? असा खोचक सवाल देखील केला. हा उल्लेख मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) ठेवी (FD) याबाबत केला. नक्की या ठेवी आहेत तरी काय? कितीच्या आहेत या ठेवी? हे पाहणं महत्त्वाचं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईतल्या विविध प्रकल्पाचं भूमिपूजन आणि उद्घाटन केलं. यात मेट्रो मार्ग, सांडपाणी प्रकल्प, रस्ते आणि दवाखाने यांचा समावेश आहे. मोदी यांनी उद्घाटन पर भाषणात शिवसेना उद्धव ठाकरे गटावर निशाणा साधला. यात मुंबई महापालिकाचा भ्रष्टाचार , मेट्रो आणि सांडपाणी प्रकिया प्रकल्प या कामात दिरंगाई आरोप केला. त्याच बरोबर पैसे असूनही, पैसे केवळ साठवून ठेवले असा आरोप त्यांनी भाषणात केला.
मुंबई महापालिकापूर्वी काँग्रेसच्या ताब्यात होती. त्यानंतर शिवसेनेनं ही महापालिका ताब्यात घेतली. १९९८ मध्ये मुंबई महापालिकेवर जवळपास ६६० कोटी रुपये कर्ज होतं. ही महापालिका तोट्यात होती. १९९८ नंतर महापालिकेने मालमत्ता कर, जकात, पाणी कर यातून जमा झालेल्या निधीतून सुरक्षित रक्कम बाजूला काढून ठेवण्याची प्रथा सुरू झाली.
मुंबई महापालिकेतेली गेल्या पंचवीस वर्षात ही ठेवी तब्बल ९२ हजार कोटींवर गेली आहे. भारतात कुठल्याही महानगरपालिकेकडे इतक्या प्रचंड प्रमाणात सुरक्षित ठेवी नाहीत. ही सर्व सुरक्षित रक्कम असून, मुंबई महापालिका अतिशय अडचणीत आली किंवा विकासाच्या नवीन प्रकल्प यांना निधी लागत असेल तर या निधीचा वापर करता येईल असा या मागे उद्देश आहे.
शिवसेनेसोबत भाजप महापालिकेत सत्तेत असताना विशेषतः आशिष शेलार नगरसेवक असताना त्यांनी या मुद्यावर लक्ष वेधले होते. महापालिकेत ठेवी जमा करून करणार काय? असा मुद्दा उपस्थित केला होता. विकासाच्या प्रकल्पात तो खर्च करावा ही भूमिका घेतली होती. गेल्या निवडणुकीतही भाजपने या मुद्द्याला हात घातला, पण त्याला फारसा यश अले नाही.
मुंबई महापालिकेचे बजेट जवळपास पन्नास हजार कोटींवर गेले आहे, मुंबईत कोस्टल रोडसह जवळपास चाळीस हजार कोटींच्यावर विकासाची कामे सुरू आहेत. तरी देखील शिवसेना विशेषतः उद्धव ठाकरे यांनी या सुरक्षित ठेवीला हात लावू दिला नाही.
भाजपला या ठेवी मोडीत काढून त्यांना महापालिका कंगाल करायची आहे, असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आहे.
ज्या महापालिकेत २० वर्ष सत्तेत होता, तेंव्हा भ्रष्टाचार दिसला नाही का? तसेच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला पाहिलं विरोध आशिष शेलार यांनी केला होता, असे अनेक मुद्दे शिवसेना आगामी काळात उचलून धरेल याच शंका नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महापालिकेच्या सुरक्षित ठेवी चा मुद्दा उपस्थित करत हा मुद्दा आगामी निवडणुकीत गाजणार हे संकेत दिले आहेत.