आमदार प्रकाश सुर्वेंच्या मुलाची गुंडगिरी; बंदुकीच्या धाकावर अपहरण करत व्यावसायिकाला मारहाण

आमदार प्रकाश सुर्वेंच्या मुलाची गुंडगिरी; बंदुकीच्या धाकावर अपहरण करत व्यावसायिकाला मारहाण

मुंबई : शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे याच्याविरोधात वनराई पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर मनोज मिश्रा, पद्माकर, राज सुर्वे, विकी शेट्टी आणि 10 ते 12 जणांवर अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. मुंबईतील गोरेगाव येथील ग्लोबल म्युझिक जंक्शन कंपनीचे सीईओ राजकुमार सिंग यांनी याबाबत तक्रार दिली होती.  पैशांच्या व्यवहारातून ही घटना घडली असल्याची माहिती आहे (case has been registered against Shiv Sena MLA Prakash Surve’s son Raj Surve in Vanrai Police Station)

नेमके काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकुमार सिंग यांची गोरेगाव पुर्व येथे ग्लोबल मुझिक जंक्शन प्रा. लि नावाची कंपनी आहे. ही कंपनी डिजीटल लॅटरल स्वरूप ठेवून लोन देण्याचे काम करते. सदर गुन्ह्यातील आरोपी मनोज मिश्रा यांची अदिशक्ती प्रा. लि. नावाची मुझिक कंपनी आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून तक्रारदार आणि आरोपी हे दोघेही 2019 पासून एकमेकांना ओळखतात. मनोज मिश्राला पैश्याची आवश्यकता असल्याने त्यांनी त्याचा अदिशक्ती कंपनीचे डिजिटल लाईसेन्स गहाण ठेवून कर्ज घेण्याचे निश्चित केले. यानंचर ग्लोबल म्युझिक जंक्शन कंपनीनेही डिजिटल लाईसन्सवर कर्ज देण्याचा निर्णय घेतला.

त्याप्रमाणे 2019 मध्ये सर्व कागदपत्रांची पूर्तता करून ओ.टी. टी (ओवर द टॉप) प्लॅटफॉर्मसाठी मिश्राने एक वर्षाकरिता करारपत्र केले होते. त्यानंतर ग्लोबल मुझिक जंक्शन कंपनीचा व्यवहार व्यवस्थित वाटल्याने त्याने 2021 मध्ये युट्युब चॅनल करिता 8 कोटी रूपये लोन (अॅडवान्स) स्वरूपात घेतले होते. हे करारपत्र 5 वर्षांसाठी म्हणजे 2026 पर्यंत होते, तर त्याचा लॉकिंग पिरिएड 03 वर्षांचा होता. 05 वर्षामध्ये नमूद कंपनी बरोबर झालेल्या करारा प्रमाणे ग्लोबल मुझिक जंक्शनला 11 कोटी रूपये मिळणार होते.

काही दिवसांनी मनोज मिश्राला त्याच्या चॅनेलच्या प्रगतीसाठी दिलेला पैसे त्याने त्याच्या चॅनेल कंटेट बनविण्याकरिता न वापरता दिलेले पैसे इतर जागी लावल्याचे राजकुमार सिंग यांच्या लक्षात आलं. तसंच त्याच्या कंपनीकडून ग्लोबल मुझिक जंक्शन कंपनीस प्राप्त होणारा नफा कमी झाला. परिणामी फिर्यादी राजकुमार सिंग यांनी मनोज मिश्राला चॅनेलमध्ये कंटेट बनविण्याकरिता सांगितले. त्यावर त्याने राजकुमार सिंग यांच्याकडे अधिक पैश्यांची मागणी केली. मात्र त्यास त्यांनी नकार दिला. कारण कराराच्या वेळीच त्यांनी त्याच्या कंपनीचा मोबदला पूर्ण स्वरूपात दिला होता. त्यास अधिक रक्कम देण्यास नकार दिला असता सप्टेंबर 2022 त्यानंतर त्याने राजकुमार सिंह यांच्यावर सदर अग्रिमेन्ट रद्द करण्यासाठी दबाव टाकू लागला.

त्यानंतरही आरोपी मनोज मिश्रा हा फिर्यादी राजकुमार सिंह यांच्याकडे वारंवार पैशांची मागणी करु लागला. त्यावर राजकुमार यांनी मिश्राला समजावून सांगितले आणि सेटलमेंट करु असे सांगितले. त्याप्रमाणे राजकुमार सिंह यांनी जुन 2023 आणि जुलै 2023 मध्ये मिश्राला 1 कोटी रूपये बँक खात्यात दिले. त्यानंतर देखिल त्याने वेगवेगळी कारणे सांगून अधिक पैसे मागण्यास सुरवात केली. त्यावेळी त्याला नकार देवून त्याचा चॅनल व्यवस्थित चालविण्यास सांगितले.

यानंतर 9 ऑगस्टला दुपारी प्रकाश सुर्वे यांच्या ऑफिसमधून राजकुमार यांना फोन आला. यात त्यांना ऑफिसमध्ये येऊन जाण्यास सांगितले. मात्र त्यांनी शनिवारी येतो असे सांगितले. त्यानंतर काही वेळातच 10 ते 15 लोक जबरदस्ती घुसले आणि राजकुमार सिंह यांची कॉलर पकडून त्यांना मारहाण केली. त्यानंतर शिविगाळ करून त्यांना ऑफिसमधून खेचत लिफ्टमधुन खाली घेवून आले आणि जबरदस्ती गाडीत बसवले. तिथून बंदुकीच्या धाकावर प्रकाश सुर्वे यांच्या दहिसर येथील ऑफिसला घेऊन गेले. तिथे राज सुर्वे उपस्थित होता. त्याने राजकुमार सिंह यांना धमकी देत संबंधित जे काही प्रकरण आहे ते क्लिअर करा आणि जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत इथून सोडणार नाही अशी धमकी दिली.

त्यानंतर राजकुमार सिंह यांना एका इमारतीत नेले. त्याचवेळी राजकुमार सिंह यांना पोलिसांचा फोन गेला असता, त्यांच्यावर दबाव टाकून काही अडचण नाही असे सांगण्यास भाग पाडले. त्याचवेळी त्यातील एका इसमाने राजकुमार यांच्या कंबरेला बंदूक लावून 100 रूपयांच्या स्टॅम्प पेपरवर “आदिशक्ती प्रा.लि व माझ्या कंपनीमध्ये पूर्वी झालेले करार आज पासून रद्द होत आहेत” असे लिहून त्यावर सही घेतली. त्यानंतर बाजुच्या रूममध्ये असणाऱ्या महिलांकडे बोट दाखून कोठेही वाच्यता केल्यास खोटी केसेस टाकण्याची धमकी दिली.

त्यानंतर काही लोकांनी राजकुमार यांना रिक्षात बसवून जवळच असलेल्या एका ऑफिसमध्ये घेवून गेले. इथे त्यांचा फोन ताब्यात घेतला आणि फोन घेण्यास मज्जाव केला. त्यानंतर मनोज मिश्रा व आणखी एका इसमाने त्यांना रिक्षातून दहिसर पूर्व येथील प्रकाश सर्वे यांच्या ऑफिसमध्ये घेवून गेले. रिक्षातुन येत असताना मनोज मिश्रा याने पोलीसांना काही सांगू नका अशी धमकी दिली आणि फोन परत केला. तिथे गेल्यानंतर पोलीसही उपस्थित होते. मात्र तिथे राजकुमार सिंह यांनी काहीही तक्रार नसल्याचे सांगितले. त्यानंतर नातेवाईक आणि मित्रांनी राजकुमार सिंह यांना वनराई पोलीस स्टेशनला आणले त्यावेळी त्यांनी मनोज मिश्रा, पद्माकर, राज सुर्वे, विकी शेट्टी व इतर 10 ते 15 इसमांच्या विरुध्द तक्रार दिली. या तक्रारीवरुन 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube