बनावट कागदपत्रांच्या आधारे ऐतिहासिक दुर्गाडी किल्लाच नावावर केला, आरोपीविरुध्द गुन्हा दाखल
Durgadi Fort : कल्याण शहरातील मानाची वास्तू असलेल्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याचे (Durgadi Fort) महत्त्व सर्वांनाच ठाऊक आहे. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पदस्पर्शाने पावन झालाला आहे. मात्र, याच दुर्गाडी किल्ल्याचे बनावट कागदपत्र बनवून तो नावावर केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. याप्रकरणी बनावट पेपर तयार करुन ठाणे जिल्हाधिकाऱ्याकडे देण्यात आले होते. दस्तावेज तपासणी दरम्यान बनावट लेटर आणि स्वाक्षरी आढळून आल्यानं हे प्रकरण समोर आलं.
किल्ल्याची जागा नावावर करणाऱ्याचं नाव सुयश शिर्के (सातवाहन) असं आहे. त्याच्या विरोधात महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. सुयश हा माळशेज नाणेघाट व इतर वनक्षेत्र व पर्यटन स्थळ विकास समितीचा अध्यक्ष असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुयश शिर्के याने 12 सप्टेंबर 2022 रोजी किल्याची जागा आपल्या नावाने करून घेण्यासाठी नाहरकत दाखल्यासाठी अर्ज दिला होता. या अर्जात त्याने शिर्के (सातवाहन) राजाचे वंशज आणि वारसदार असल्याचा उल्लेख करून कल्याण तहसील कार्यालयातील 5 ते 7 कागदपत्रांवर शिक्के आणि अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या असलेलं कागदपत्रे अर्जासोबत जोडले. सदरच्या जागेचं प्रकरण ऐतिहासिक किल्लाविषयी असल्यानं मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवण्यात आलं होतं.
तहसीलदारांच्या नावे बनावट पत्रे साडपले
दरम्यान, 24 फेब्रुवारी 2023 रोजी कल्याण मंडल अधिकारी कार्यालयात या किल्ल्याच्या जागेसंदर्भात कागदपत्र तपासणीदरम्यान कल्याण तहसीलदार कार्यालयाच्या नावाने बनावट पत्रासह अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी असलेले कागदपत्रं आढळून आली. त्यामुळं ही घटना उघडकीस आली .त्यानंतर २ नोव्हेंबर रोजी कल्याण तहसीलदार कार्यालयात मंडळ अधिकारी प्रीती घुडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्यात सुयश शिर्के नावाच्या व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
Ankita Raut: मराठी अभिनेत्री अंकिता राऊत म्युझिक अल्बमसाठी करणार ‘जीवाचं रानं’
ज्या जागे संदर्भात शिर्के सातवाहन याने अर्ज केला होता. त्याठिकाणी किल्ले दुर्गाडी आहे. दुर्गाडी किल्ल्याच्या जागेचे वंशज असल्याचं दाखवून बनावट कागदपत्रांच्या आधारे तो नावावर केला होता. मात्र, त्याने सादर केलेली कागदपत्रे ही साक्षांकित नाहीत, अशी तक्रार घुडे यांनी दिला. घुडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर सुयश शिर्के (सातवाहन) याच्याविरुद्ध भादंवि कलम ४२०, ४६५, ४६६, ४६८, ४७१, ७७३ अन्वये २ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे.