Budget Session : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरुन अजित पवार विधानसभेत आक्रमक
मुंबई : 2014 साली राज्यात भाजपाचे (BJP) सरकार आले होते.निवडणुकीच्या आधी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक (Chhatrapati Shivaji Maharaj Memorial) अरबी समुद्रात बांधणार अशी घोषणा केली होती. सत्तेत आल्यानंतर त्याचे जलपुजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते झाले. पण आजही हे स्मारक अस्तित्वात आलेले नाही. आता तर उपमुख्यमंत्री त्या स्मारकाचे नावही काढत नाहीत, असा सवाल करत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) विधानसभेत चांगलेच आक्रमक झाले.
पुढं अजित पवार म्हणाले, राज्यपालांच्या अभिभाषणातही मी याचा उल्लेख केला होता. पण मला कोणतेही उत्तर मिळाले नाही. निवडणूक संपली, चुनावी जुमला होता, विसरुन जा. स्मारक करायचं असेल तर मग ठोक हजार-पाच हजार कोटी रुपयांची तरतूद सरकारने का केली नाही? या स्मारकाबाबत स्पष्ट शब्दात सांगून टाकावे की, होणार आहे, होणार नाही. म्हणजे, यापुढे हा विषय आम्ही सभागृहात काढणार नाही. जनतेच्या दरबारात घेऊन जाऊ, अशी टीका अजित पवार यांनी केली.
Ajit Pawar : 288 आमदारांमध्ये फक्त 40 आमदारांचे सरकार, भाजपमध्ये धूसफूस
अर्थसंकल्पातून राज्यातील कोणत्याच घटकाला फारसं काही मिळणार नाही. केवळ घोषणांचा अवकाळी पाऊस पाडण्याचं काम अर्थसंकल्पातून झालं आहे, त्यामुळं सर्वसामान्य जनतेच्या आशा-आकांक्षा वाहून गेल्या आहेत. या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य जनतेची घोर निराशा झाली असून हा अर्थसंकल्प म्हणजे बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात आहे, असे टिकास्त्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सोडले.
विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, सर्व घटकांना, सर्व भागांना समान न्याय देणारा, सर्व घटकांना दिलासा देणारा, राज्याच्या समतोल विकासाला चालना देणारा, अर्थव्यवस्था बळकट करणारा, लोकप्रिय घोषणा टाळून ठोस उपाययोजना करणारा आणि राजकोषीय उत्तरदायित्वाला प्राधान्य देणारा अर्थसंकल्प असेल अशी राज्यातल्या जनतेची अपेक्षा होती. मात्र राज्याच्या अर्थसंकल्पाने सर्वसामान्य जनतेची घोर निराशा झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सारख्या हुशार अर्थमंत्र्यांच्याकडून अनेक अपेक्षा होत्या मात्र फडणवीस (Devendra Fadnavis) सपशेल अपयशी ठरले आहेत.