परमेश्वराचे अन् तुमच्या आशीर्वादामुळे वाचलो, नाहीतर श्रद्धांजली सभाच घ्यावी लागली असती

  • Written By: Published:
परमेश्वराचे अन् तुमच्या आशीर्वादामुळे वाचलो, नाहीतर श्रद्धांजली सभाच घ्यावी लागली असती

बारामती : “तिसऱ्या मजल्यावरुन चौथ्या मजल्यावर जायला निघालो पण मध्येच वीज गेली अन् चौथ्या मजल्यावर पोहोचायच्या काही संकेद आधीच आमची लिफ्ट धाडकन खाली आदळली. परमेश्वराचे आणि तुम्हा सगळ्या लोकांचे आशीर्वाद म्हणून मी अपघातातून वाचलो नाहीतर आज श्रद्धांजली सभाच घ्यावी लागली असती,” असा जीवघेणा अनुभव विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितला. ते बारामतीत बोलत होते.

अजित पवार बारामती दौऱ्यावर आहेत. तालुक्यातील पवईमाळ येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन अजितदादांच्या हस्ते पार पडले. याच कार्यक्रमात बोलताना त्यांनी शनिवारी (ता.14 जानेवारी) पुण्यात लिफ्टमध्ये अडकल्याचा जीवघेणा अनुभव आपल्या मिश्किल शैलीत सांगितला.

अजित पवार हे पुणे दौऱ्यावर होते. पुणे येथील हर्डीकर हॉस्पिटलमध्ये उद्घाटनासाठी लिफ्टने जात असताना चौथ्या मजल्यावर जाताना लिफ्ट बंद पडली आणि काही क्षणात लिफ्ट चालू होऊन काही कळायच्या आत थेट जमिनीवर आदळली. लिफ्टचा दरवाजा तोडून आम्ही बाहेर निघालो नाहीतर आज श्रद्धांजलीचा कार्यक्रम झाला असता. मी ही गोष्ट कोणालाच बोललो नाही. अगदी मीडियाला सुद्धा बोललो नाही. नाहीतर लगेच ब्रेकिंग न्यूज सुरू झाली असती. मात्र, आज तुम्ही घरची माणसे असल्याने मला राहवलं नाही, असं म्हणत अजितदादांनी पुण्यातील प्रसंग बारामतीच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसमोर कथन केला.

“काल वडिलांचा स्मृतिदिनाचा कार्यक्रम असल्याने त्यांचा श्रद्धांजली वाहण्यासाठी बारामतीला आलो. मात्र घडलेला प्रसंग मी सुनेत्राच्या कानावरही घातला नाही आणि कुटुंबियांनाही सांगितला नाही. प्रसंग बाका होता पण त्यातून आम्ही वाचलो, असेही अजित पवार म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube