Anil Parab vs Kirit Somaiya : अनिल परब आणि किरीट सोमय्या यांच्यातील वाद जाणून घ्या
मुंबईः ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांचे वांद्रे येथील म्हाडा कॉलनमधील अनधिकृत कार्यालय तोडण्यात आले आहे. परब यांच्या कार्यालयाबाबत सोमय्या यांनी लोकायुक्तांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. यावरून अनिल परब आणि किरीट सोमय्या यांच्यामध्ये वाद टोकाला गेला आहे.
नेमकं प्रकरण काय ? जाणून घ्या
वांद्रे येथील म्हाडा कॉलनी इमारत क्रमांक 57 व 58 येथील मोकळ्या जागेत हे कार्यालय होते. हे कार्यालय अनधिकृत असल्याची तक्रार भाजपनेते किरीट सोमय्या यांनी लोकायुक्तांसमोर केली. त्यानंतर म्हाडानेही हे बांधकाम पाडण्याची नोटीस परब यांना बजावली. मात्र हे बांधकाम पाडण्यात आले नाही.
परब यांनी हे बांधकाम नियमित करण्यासाठी म्हाडाकडे प्रस्ताव दिला. हा प्रस्ताव म्हाडाने फेटाळून लावला. त्यामुळे सोमय्या यांनी पुन्हा बांधकाम पाडण्याची मागणी केली. त्याची दखल घेत म्हाडाने हे बांधकाम पाडण्याचे आदेश जारी केले. या आदेशानुसार सोमवारी हे बांधकाम पाडण्यात आले, असा दावा सोमय्या यांनी केला आहे.
दरम्यान या प्रकरणावर माजी मंत्री अनिल परब याणी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. परब म्हणाले की, म्हाडा आणि या इमारतीमधील रहिवासी म्हणून बोलत आहे. या इमारतीत माझा जन्म झाला आणि बालपण गेलं. आता या इमारती म्हाडाच्या मालकीच्या राहिलेल्या नाही. सोसायटीची जागा मला वापरायला दिली होती. रहिवांशाच्या विनंतीवरुन जनसंपर्क कार्यालयासाठी सोसायटीची जागा वापरत होतो.
परंतु या जागेबाबत काहींनी तक्रारी केली. मात्र या जागेसाठी मी रहिवासी कोर्टात गेलो तेव्हा रेग्युलायझेशनचा अर्ज केला. म्हाडाने मला पत्र दिलं की रेग्युलाईज करता येणार नाही. मात्र आता या जागेसाठी किरीट सोमय्यांनी म्हाडावर दबाव टाकला असल्याचा आरोप देखील परब यांनी केला आहे .
सोमय्या यांनी अनिल परब यांच्या दापोली येथील साई रिसॉर्ट अनधिकृत असल्याची तक्रार केली आहे. या रिसॉर्टचे बांधकाम करताना सीआरझेड नियमांचे उल्लंघन झाल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. याप्रकरणी दापोली न्यायालयाने नुकताच परब यांना जामीन मंजूर केला आहे.