मोठी बातमी : कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकरांवर गुन्हा दाखल

मोठी बातमी : कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकरांवर गुन्हा दाखल

Mumbai News : मुंबईतील कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी आज अखेर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बॉडी बॅग खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या कारवाईमुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

‘आदित्य ठाकरेंच्या डोळ्यांना पट्टी, उत्तर देऊन फायदा काय?’ फडणवीसांचा खोचक टोला

 

मुंबई महापालिकेन कोरोना काळात कोट्यावधी रुपयांचा घोटाळ केल्याचा आरोप होत आहे. कोविड काळात काढण्यात आलेल्या टेंडर प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याचे ईडीचे म्हणणे आहे. यात किशोरी पेडणेकर यांचाही सहभाग होता, असे ईडीचे म्हणणे आहे. त्यातच आता पेडणेकर यांच्यासह आणखी दोन जणांवर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

कोविडने मरण पावलेल्या रुग्णांना घेऊन जाण्यासाठी वापरण्यात येणारी बॉडी बॅग दोन हजार रुपयांऐवजी 6800 रुपयांना खरेदी करण्यात आल्याचे ईडीने म्हटले होते. हे कंत्राट तत्कालीन महापौरांच्या सूचनेनुसार देण्यात आल्याचा आरोप ईडीने केला होता. या काळात किशोरी पेडणेकर या मुंबईच्या महापौर होत्या. त्यानंतर ईडीने 21 जून रोजी राज्यभरात छापेमारी केली होती. यामध्ये काही रोकड आणि स्थावर मालमत्ता सील केली होती.

आणखी तीन नेते जेलमध्ये जाणार – सोमय्या

किशोरी पेडणेकर आता जेलमध्ये जाणार आहेत. दीड हजार रुपयांची डेड बॉडी बॅग 6 हजार 700 रुपयांना खरेदी केली. मुंबई पोलिसांनी किशोरी पेडणेकर आणि एएमसीविरोधात एफआयआर दाखल केला. याआधी ईडीनेही छापे टाकले होते. आम्ही सुद्धा 13 जुलै रोजी तक्रार दाखल केली होती. आणखी तीन घोटाळ्यांचा तपास सुरू आहे. यावरही लवकरच कारवाई होईल. आधी संजय राऊत यांचे साथीदार सुजीत पाटकर जेलमध्ये गेले होते, आता किशोरी पेडणेकर नंतर आणखी तीन नेते जेलमध्ये जातील अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

भाजपचं सुडाचं राजकारण – खा. सावंत

भाजपचं हे सुडाचं राजकारण सुरू आहे. पंतप्रधानांनी राष्ट्रवादीवर घोटाळ्याचे आरोप केले. खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्याबद्दल चक्की पिसिंगचा नारा दिला होता. पण आता ही सगळी माणसं पावन झाली. जे दबावाला बळी पडत नाहीत त्यांना अशा पद्धतीने गुंतवण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यांची जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा हा डाव सुरू आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी भाजपवर केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube