Girish Bapat : खासदार बापट कार्यकर्त्यांना भेटायला आले कट्ट्यावर अन् झाली गर्दी…
पुणे : गेल्या काही महिन्यांपासून भाजप नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट हे आजारी असल्याने त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते.
दरम्यान, त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याने रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. आजारातून थोडं बरं वाटल्यानंतर खासदार बापटांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या भेटण्यासाठी आपल्या मतदारसंघातील कसबा कार्यालय काल (ता.17 जानेवारी) गाठलं आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. बापट कसबा कार्यालयात पोहोचल्याची बातमी कार्यकर्त्यांना समजताच बघता बघता कार्यालय परिसरात हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
खासदार बापट हे गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांना श्वसनाचा त्रास आहे. ते आजारी असल्यामुळे सर्वपक्षीय राजकीय नेते मंडळींनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या भेटी घेतल्या होत्या.
गेल्याच महिन्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील रुग्णालयात जाऊन बापट यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि महिन्याभरात संसदेचे अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे संसदेत भेटू, अशा शब्दात पवार यांनी बापट यांना धीर दिला होता.
दरम्यान, खासदार बापट हे आजारी पडल्यानंतर काल पहिल्यांदाच सुमारे दीड महिन्यानंतर कसबा कार्यालयात आले होते. ते कार्यालयात येणार याची कुणालाच कल्पना नव्हती. ती नेहमीप्रमाणे जसे कार्यालयात यायचे आणि ज्या ठिकाणी बसायचे तिथे येऊन बसले होते. दरम्यान, अचानक बापट कार्यालयात दिसल्याने कार्यकर्त्यांना मोठा आनंद झाला. ही बातमी लगेच कार्यकर्त्यांपर्यंत पोचली आणि कार्यकर्त्यांनी जमायला सुरुवात केली.
त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे ते आपल्या घरीच विश्रांती घेत आहेत. मात्र अजूनही ऑक्सिजनची श्वसन नलिका त्यांना लावलेली आहे. असे असूनही बापट यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी कसबा कार्यालय गाठलं आणि भेटलेल्या कार्यकर्त्यांची नेहमीप्रमाणे विचारपूस केली. यामुळे कार्यकर्ते कमालीचे आनंदी झाले होते.
दरम्यान, बापट यांची पुण्याच्या राजकारणावर मोठी छाप असून त्यांनी कसबा विधानसभा मतदारसंघातून दीर्घकाळ आमदार म्हणून काम केलं आहे. तर आता खासदार म्हणून कार्यरत आहेत.