Amruta Fadnavis Bribe Case : उल्हासनगरमध्ये बुकी अनिल जयसिंघानी यांच्या घरावर छापे
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना १ कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी उल्हासनगरमध्ये छापेमारी करण्यात आली. उल्हासनगरमध्ये बुकी अनिल जयसिंघानी याच्या घरावर मुंबई पोलिस (Mumbai Police) आणि गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला आहे.
यावेळी त्यांची मुलगी डिझायनर अनिक्षा आणि मुलगा अक्षन दोघेही घरात होते. मुलगी अनिक्षा हिच्या विरोधात अमृता फडणवीस यांनी मलबार पोलिस ठाण्यात (Malabar Police Station) गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आज मुंबई पोलिसांनी ही छापेमारी केली. यावेळी दोघांनीही पोलिस चौकशी टाळ्याचा प्रयत्न केला आहे. अलिल जयसिंगानी याचा मुलगा अक्षन याने प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात दाखल झाला असल्याचा दावा केला आहे. तर मुलीने आपल्या परीक्षा सुरू असल्याचा दावा केला आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात याविषयी माहिती दिली आहे. डिझायनर अनिक्षाने याअगोदर मला आणि माझ्या कुटुंबियांना अडकवण्याचा प्रयत्न केला होता. तसेच अनेकवेळा धमक्या देखील देण्यात आल्या होत्या. मला अडचणीत आणण्याकरिता हा ट्रॅप होता असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.
एक कोटींचं लाच प्रकरण नेमकं काय? फडणवीसांकडून संपूर्ण घटनेचा उलगडा
नेमकं काय आहे प्रकरण ?
एका केसमध्ये मदत करण्यासाठी डिझायनर अनिक्षा जयसिंघानी या मुलीने अमृता फडणवीस यांना एक कोटी रूपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला. शिवाय त्यांना धमकी देखील देण्यात आली अशी तक्रार अमृता फडणवीस यांनी मुंबईतील (Mumbai) मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये (Malabar Hill Police Station) २० फेब्रुवारी रोजी तक्रार दिली होती.
या तक्रारीनंतर अनिक्षाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अनिक्षा ही गेल्या १६ महिन्यांहून अधिक काळ अमृता फडणवीस यांच्या संपर्कात होती आणि तिने अमृता यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. एका गुन्ह्यात मदत करण्याची मागणी करत १ कोटी रुपयांच्या लाचेची ऑफर अमृता फडणवीस यांना अनिक्षा आणि तिच्या वडिलांनी दिल्याचा आरोप त्यांनी केला.