आता मुंबईतील ‘एन्ट्री’ आणखी सोपी; दहिसर टोलनाक्याबाबत सरकारने घेतला ‘हा’ निर्णय
दहिसर टोलनाका तेथून दोन किलोमीटर पुढे वर्सोवा पुलासमोरील नर्सरीजवळ स्थलांतरित होणार आहे अशी माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली.

Mumbai News : दररोज लाखो वाहनचालकांना नाहक थांबावे लागते, इंधनाचा अपव्यय होतो, प्रदूषण वाढते आणि कारण एकच – दहिसर टोल नाका. या टोलमुळे मीरा-भाईंदर ते मुंबई प्रवास नागरिकांसाठी अक्षरशः डोकेदुखी ठरला आहे.
दररोज अर्धा ते एक तास वाढणारा प्रवास लांबच लांब वाहनांच्या रांगा, वाढलेले प्रदूषण या सर्वांचा त्रास गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिकांना सहन करावा लागत होता. यासंदर्भात स्थानिक आमदार, लोकप्रतिनिधी व नागरिक सातत्याने आवाज उठवत होते. अखेर शासन पातळीवर उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तक्षेपाने हा प्रश्न मार्गी लागला. बैठकीला दहिसरचे आमदार प्रकाश सुर्वे, पोलीस आयुक्त निकेत कौशिक, MSRDC व NHAI चे अधिकारी, IRB चे प्रतिनिधी अशा मान्यवरांची उपस्थिती होती.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की दहिसर टोल नाका तेथून दोन किलोमीटर पुढे वर्सोवा पुलासमोरील नर्सरीजवळ स्थलांतरित होणार आहे. दिवाळीपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण होईल. यामुळे मीरा-भाईंदरकरांना व मुंबईकडे जाणाऱ्या लाखो प्रवाशांना वाहतूक कोंडी व टोलचा त्रास कमी होईल. शिवसेनेच्यावतीने नागरिकांना दिलासा म्हणून हा दिवाळीचा ‘टोलमुक्त प्रवास’ भेट मिळणार असल्याचा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला.