PRAKASH BAL ; …तर लोकसभेपासून ग्रामपंचायतीपर्यंत राजीनामे द्या
मुंबई : मानहानीच्या प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधींना (Rahul Gandhi) सुरत न्यायालयाने दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. आज लोकसभा लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींची खासदारकी (Disqualified) रद्द केली आहे. यावर ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ (PRAKASH BAL) यांनी ‘राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयाला चोख उत्तर द्यायचं असेल तर काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांच्या सदस्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यायला हवा’, असा सल्ला दिला आहे.
राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्यानंतर प्रकाश बाळ यांनी आपल्या भावना फेसबुकद्वारे मांडल्या आहेत. ते लिहितात, ‘राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयाला चोख उत्तर द्यायचं असेल, तर काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांच्या सदस्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यायला हवा. त्याचबरोबर काँग्रेसच्या हाती छत्तीसगड आणि राजस्थानही जी दोन राज्यं आहेत, तेथील मुख्यमंत्र्यांनीही राजीनामे द्यावेत. त्याचबरोबर लोकसभेपासून ग्रामपंचायतीपर्यंतच्या संस्था जे विरोधी पक्ष सदस्य असतील, त्यांनी रस्त्यावर उतरून जेलभरो आंदोलन सुरू करणे अत्यंत गरजेचं आहे.’
राहुल गांधींकडे दोनच पर्याय; नाही तर तुरुंगात मुक्काम
प्रकाश बाळ पुढं लिहितात, ‘एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की, सध्याची जी मोदी यांची एकाधिकारशाही आहे, त्याला नैतिकतेनंच उत्तर देणे भाग आहे आणि कोणत्याही प्रकारच्या नैतिकतेसाठी त्याग हा आवश्यक घटक असतो. त्यामुळे न्यायालयांच्या वगैरे नादी न लागता, सत्तेचा त्याग करून व जनतेत जाऊन आपलं म्हणणं मांडून पुन्हा होणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाण्यानंच मोदी यांना शह देण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.’
लोकसभा सचिवालयाने आज राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश जारी केला आहे. मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवून गुरुवारी सुरत न्यायालयाने त्यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्यावर ‘मोदी आडनाव’वर वादग्रस्त टिप्पणी केल्याचा आरोप होता. या प्रकरणी गुजरातचे भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधींवर मानहानीचा खटला दाखल केला होता.