Satyajeet Tambe यांना उत्तर: शेवटपर्यंत कोणाची वाट पाहात होते ?
मुंबई: सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यावर आता काँग्रेसककडून उत्तर आलं आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवाराला काँग्रेस पक्षाने कोरे AB फॉर्म पाठवले होते व पाठवलेले कोरे एबी फॉर्म योग्य तेच होते, असे प्रत्युत्तर काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी दिले आहे.
सत्यजीत तांबे यांना काँग्रेस पक्षाने कोरे AB फॉर्म पाठवले होते व पाठवलेले कोरे एबी फॉर्म योग्य तेच होते. हे एबी फॉर्म मिळाल्याचा ‘ओके’ असा मेसेजही विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांचे ओएसडी सचिन गुंजाळ यांनी मोबाईलवरून पाठवला होता,असे अतुल लोंढे यांनी सांगितले आहे.
लोंढे पुढे म्हणाले की, सत्यजित तांबे यांनी काँग्रेस पक्ष व एबी फॉर्म संदर्भात जे आरोप केले आहेत ते संपूर्णपणे चुकीचे आहेत. नाशिक पदवीधर मतदारसंघातून कोणी निवडणूक लढायची याचा निर्णय तांबे कुटुंबाने घ्यावा अशीच भूमिका पक्षाने घेतली होती.
कौटुंबिक पातळीवरचा निर्णय त्यांनी का घेतला नाही? वेळेवर जाऊन फॉर्म का भरला नाही?, शेवटपर्यत ते कोणाची वाट पहात थांबले होते? सुधीर तांबे यांनी फॉर्म का भरला नाही? कोरे एबी फॉर्म असताना सत्यजित तांबे यांनी आपल्या अर्जासोबत एबी फॉर्म का जोडला नाही? अर्ज भरताना कार्यकर्ते का बरोबर घेतले नाहीत? या प्रश्नांची उत्तरे द्यायला हवी होती.
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आवश्यक असणारा पक्षाचा एबी फॉर्म हा कोरा व योग्य तोच पाठवला होता, त्यात कोणतीही चूक नव्हती. बाळासाहेब थोरात यांचे OSD सचिन गुंजाळ यांच्याकडे कोरे एबी फॉर्म पाठवले होते व त्यांनी ओके असे उत्तर दिले होते, याचे पुरावेही लोंढे यांनी पत्रकार परिषदेत दाखवले.
एबी फॉर्म मध्ये काही चुकीचे होते अशी त्यांची तक्रार होती तर ते एबी फॉर्म सत्यजित तांबे यांनी बदलून का घेतले नाहीत? प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना फोन केला होता पण फोन लागला नाही हा त्यांचा आरोपही चुकीचा आहे. नाना पटोले १० जानेवारी रोजी कार्यकारिणीच्या बैठकीसाठी नागपूरमध्ये होते त्यांनतर दुसऱ्या दिवशी अमरावतीला काँग्रेस उमेदवाराचा फॉर्म भरण्यास ते गेले होते.
यावेळी आमदार अभिजित वंजारी यांच्या फोनवरून सुधीर तांबे यांच्याशी व आमदार वजाहत मिर्झा यांच्या फोनवरून सत्यजित तांबे यांच्याशी नाना पटोले यांची चर्चा झाली होती. ते दोघेही यासंदर्भात माहिती देऊ शकतात.
सत्यजित तांबे यांचा पुस्तक प्रकाशन सोहळा व त्यानंतर तांबे यांची भाजपाबरोबर जवळीक होत आहे याची माहिती अजित पवार यांनी बाळासाहेब थोरात यांना माहिती दिली होती. अहमदनगरचे राजकारण व विखे पाटील यांचा भाजपातील वाढता दबदबा पाहता आता भाजपा आपल्याला पक्षात प्रवेश देणार नाही असे दिसत असल्यानेच सत्यजित तांबे यांनी ही खेळी खेळली आहे का?
उमेदवारीसंदर्भात जो निर्णय घेतला जातो तो वरिष्ठ पातळीवरच घेतला जातो. सुधीर तांबे यांचे नाव सर्व प्रक्रिया पूर्ण करुन जाहीर केले होते. ते बदलायचे होते तर त्यांनी तसे सांगितले असते तर तेही करण्यात आले असते.
तांबे यांचा प्रदेशाध्यक्षांवर राग का आहे हे तांबेनींच सांगावे. सत्यजित यांनी पक्षाच्या व्यासपीठावर बोलणे आवश्यक होते पण त्यांनी मीडियात बोलून पक्षावर व माननीय प्रांताध्यक्षांवर आरोप करणे चुकीचे आहे. सत्यजित तांबे यांनी त्यांना विचारलेल्या एकाही प्रश्नाला सरळ उत्तर दिले नाही, असेही लोंढे म्हणाले.