BMC Budget 2023 : आज सादर होणार मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प
मुंबई : देशाचा अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर आता देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई (Mumbai) महानगरपालिकेचा अर्थसंकल्प (Mumbai Municipal Corporation Budget 2023) सादर केला जाणार आहे. मुंबई महापालिकेच्या इतिहासात दुसऱ्यांदा प्रशासक म्हणून मुंबई महापालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाकडे मुंबईकरांचे लक्ष लागले असून अर्थसंकल्पामधून मुंबईकरांना नेमकं काय मिळणार हे आज समजणार आहे.
गेल्या वर्षी 45 हजार 949 कोटींचं बजेट सादर करण्यात आलं होतं. त्यानंतर नगरसेवकांचा कार्यकाळ मार्च 2022 ला संपल्यानंतर मुंबई महापालिका आयुक्त हेच प्रशासक म्हणून काम पाहतात. त्यामुळे महापालिका आयुक्त हेच यंदाच्या वर्षाचे बजेट सादर करणार आहे. आगामी निवडणुकीच्या तोंडावरच हा अर्थसंकल्प सादर होत आहे. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून नेमकी काय घोषणा होतात हे पाहणं महत्वाचे असणार आहे.
अर्थसंकल्पातून काय मिळू शकते?
या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शाळा, आरोग्य, रस्ते आणि स्वच्छतेसाठी निधीची मोठ्या प्रमाणात तरदूत मिळण्याची शक्यता आहे. या अर्थसंकल्पामध्ये सुशोभिकरण प्रकल्प, प्रदुषण नियंत्रण,आरोग्य व्यवस्थेसाठी विशेष पॅकेज मिळण्याची देखील शक्यता आहे.
अर्थसंकल्पापूर्वी विरोधकांकडून टीका
प्रशासक म्हणून बीएमसी आयुक्त हे बजेट सादर करणार असल्याने मुंबई महापालिकेच्या बजेटवर राज्य सरकारची छाप दिसून येईल. हे बजेट सादर होण्याआधीच राजकारण तापलं आहे. हे बजेट निवडणुकीआधी सादर केले जात असल्याने विरोधकांकडून हे राज्य सरकारचे निवडणूक बजेट असल्याची बजेट सादर करण्याआधीच टीका केली जात आहे.