Thackeray vs BJP : ठाकरे गटाने भाजपला डिवचले, थेट मोदी-बाळासाहेबांच्या ‘त्या’ बॅनर्सची चर्चा
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबईत अनेक ठिकाणी विकास कामांचे भूमीपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहेत. त्या अगोदरच शिवसेना-भाजप-शिंदे गटात आरोप प्रत्यारोप होत आहेत. मुंबईत गिरगाव आणि मरीन लाइन्स या ठिकाणी बाळासाहेबांपुढे मोदींची मान झुकते, या पद्धतीचे बॅनर्स लावण्यात आले.
सध्या मुंबईत शिंदे गट, भाजप आणि ठाकरे गटात प्रचंड बॅनरबाजी होत आहे. एकमेकांना बॅनर्सवरून डिवचले जात आहे. त्यात आता या बॅनर्सची भर पडली आहे. हे बॅनर्स कोणी लावले याबाबत कोणतेही माहिती नाही. अज्ञात व्यक्तीने हे बॅनर्स लावले आहेत.
बीकेसी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होणार आहे. या सभेसाठी भाजपसह शिंदे गटाने मोठी तयारी केली आहे. आज मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन होणार आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणूकीची तयारी शिंदे गट आणि भाजप करत आहे.
बाळासाहेब असताना नरेंद्र मोदी हे मातोश्रीवर आले होते. त्यावेळी त्यांनी मान झुकवून बाळासाहेबांशी हस्तांदोलन केले होते. तेच फोटो या बॅनर्सवर लावण्यात आले. परंतू या बॅनरवर कोणत्याही प्रकारचा मजकूर टाकण्यात आला नाही. हे बॅनर कोणी लावले याबाबत सध्या जोरदार चर्चा रंगत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईमध्ये सुमारे 38 हजार 800 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण, भूमिपूजन होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे. काळात होऊ घातलेल्या निवडणुकीच्या प्रचारांचा नारळच फोडण्यात आला आहे. यामुळे विरोधकांकडूनही जोरदार टीका होत आहे.
सध्या मुंबईत शिंदेगट, भाजप आणि ठाकरे गटात प्रचंड बॅनरबाजी सुरू आहे. एकमेकांना बॅनर्सवरून डिवचले जात आहे. त्यातच आता या बॅनर्सची भर पडल्याने चर्चांना उधाण आलं आहे.