‘आयआयटी’वाल्यांना नोकऱ्या मिळेनात? आकडेवारी धक्कादायक!
IIT Mumbai student fail to get placed: भारतात पदवीधर झाल्यानंतर लगेच नोकरी मिळत नाही. देशात शिक्षितांचा बेरोजगारी दरही मोठा आहे. पण आयएएम, आयआयटीमधून उत्तीर्ण होणाऱ्यांना देशातील, विदेशातील मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये लगेच नोकरी मिळते आणि कोट्यवधी रुपयांचं पॅकेजही सहज मिळतं, अशा बातम्या आपण दरवर्षी ऐकत आलोय. पण देशातील नामांकित इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (Indian Institute of Technology) अर्थात आयआयटी मुंबईमधून (IIT Mumbai) उत्तीर्ण झालेल्या इंजिनिअरला आता नोकरीसाठी (Job) वाट पाहावी लागत असल्याचं, यंदाच्या कॅम्पस् प्लेसमेंटमधून समोर आलंय.आयआयटीमधून शिक्षण घेणारे देखील बेराजगार राहू लागलेत, असंही आपण म्हणू शकतो. मुंबई आयआयटीच्या प्लेसमेंट सेलमधून किती जणांना नोकऱ्या मिळाल्या? नोकऱ्या न मिळण्याची नेमकी कारणं काय आहेत? हेच जाणून घेऊ
Parbhani Loksabha : ‘वंचित’कडून फेरबदल! परभणीत दिला तगडा उमेदवार
बेरोजगाराची आकडवारी काय सांगते ?
देशात बेरोजगारीची समस्या मोठी आहे. भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था होत असली तरी, पदवीधरांना मात्र नोकऱ्या मिळत नाहीत. ते बेरोजगार राहताहेत. नुकताच इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनकडून
भारतातील बेरोजगारीबद्दल 26 मार्चला अहवाल सादर करण्यात आला. देशात पदवीधरांच्या बेरोजगारीचा दर हा 29 टक्के इतका आहे. तर न शिकलेल्या व्यक्तींचा बेरोजगारीचा दर हा कमी म्हणजेच 3.4 टक्केच आहे. या बेरोजगारीमध्ये 83 टक्के तरुण आहेत. 2022 मध्ये 65.7 टक्के तरुण बेरोजगार होते. म्हणजे एका वर्षात बेरोजगारीचा आकडा वाढला. तर 2020 मध्ये हा दर 54.2 टक्के होता. दर्जेदार शिक्षण न मिळणं, नोकऱ्यांसाठी हवं ते कौशल्य नसणं, नोकऱ्या उपलब्ध न होणं ही त्याची कारणं असल्याचं दिसून येतंय
दहा वर्षात मोदींनी शेतकऱ्यांचा काय विकास केला? त्यांनी फक्त….; आदित्य ठाकरेंची बोचरी टीका
दोन वर्षांत कंपन्यांकडून कमी प्रतिसाद
देशातील दर्जेदार शिक्षणासाठी नावाजलेल्या, आयआयटी मुंबईसारख्या संस्थेतून शिक्षण घेणाऱ्यांना देखील आता नोकरीसाठी वाट पाहावी लागत असल्याचं समोर आलंय. आयआयटी मुंबईमधून 2024 मध्ये पदवी घेत असलेल्या दोन हजार विद्यार्थ्यांनी, कॅम्पस भरतीसाठी नोंदणी केली होती. त्यातील 36 टक्के म्हणजे 712 जणांची कंपन्यांनी निवडच केली नाही. असं होण्याचं हे पहिलंच वर्ष नाही. 2023 मध्येही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. 2023 मध्ये कॅम्पस प्लेसमेंटसाठी 2 हजार 209 विद्यार्थ्यांनी नोकरीसाठी नोंदणी केली होती. त्यात 1 हजार 485 जणांना नोकरी मिळाली. तर 32.8 टक्के विद्यार्थ्यांच्या पदरी निराशाच पडली.
म्हणजेच देशातील नामांकित संस्थेत शिक्षण घेऊनही नोकरी मिळाली नाही. विशेष म्हणजे देशात एकाही सर्वाधिक मागणी असलेल्या कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग पदवी घेणाऱ्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. माजी विद्यार्थी आणि ‘ग्लोबल आयआयटी अल्युम्नी सपोर्ट ग्रुप’चे प्रमुख धीरज सिंग यांनी दिलेल्या माहितीवरुन हे समोर आलंय. ही आकडेवारीही जानेवारी महिन्यातील आहे. प्लेसमेंट हे मे महिन्यापर्यंत सुरु राहतं. त्यामुळं आणखी काहींना नोकऱ्या मिळू शकतात.
एक कोटींचं पॅकेज आता विसरा ?
आयआयटीमधून शिक्षण घेतल्यानंतर लगेच कोटीचं पॅकेज मिळतं, अशी अनेकांची धारणा झालीय. कोटींचं पॅकेज घेणाऱ्यांची चर्चा होते. पण आता कोटींचं पॅकेज मिळणाऱ्यांची संख्याही घटलीय. 85 विद्यार्थ्यांना एक कोटी रुपयांपेक्षा जास्त पॅकेज मिळाल्याचं जाहीर झालं होतं. पण काही कंपन्यांना एक कोटींचं पॅकेज द्यायला असमर्थता दर्शवली. असं असलं तरी मात्र प्रत्यक्षात 22 विद्यार्थ्यांनाच एक कोटींचं पॅकेज मिळाल्याचं स्पष्ट करण्यात आलंय.
ही वेळ का आली?
आयआयटीसारख्या प्रतिष्ठित संस्थांमधून शिक्षण घेतल्यानंतर ही वेळ का आली? याबद्दल वेगवेगळी कारणं समोर येताहेत. जगभरातील आर्थिक मंदी हे एक कारण दिलं जातंय. देश- विदेशातील मल्टिनॅशनल कंपन्या नोकरभरतीसाठी येत असतात. यंदा नोकरीभरतीसाठी या कंपन्या कमी प्रमाणात आल्या. यात रशिया-युक्रेन युद्धाचं कारणंही दिलं जातंय. युद्ध आणि आर्थिक मंदीमुळं कंपन्यांकडून जास्तीची नोकरभरती टाळली जातेय. तसंच टेक्निकल क्षेत्रातील रोजगार कमी होण्यात ऑटोमेशन आणि एआयचा वापरही कारणीभूत आहेच. तर भारत आणि अमेरिका या महत्त्वाच्या दोन्ही देशांमध्ये सार्वत्रिक निवडणुका होताहेत. हीदेखील कारणं यामागं असल्याचं अभ्यासक सांगताहेत.