चीनी आणि तुर्कस्तानी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची हजारो महिलांनी घेतली शपथ

Sindoor Yatra : भारताच्या विरोधात जाऊन पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या चिनी आणि तूर्कस्थानी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची हजारो महिलांनी सिंदूर यात्रेत (Sindoor Yatra) शपथ घेतली. वीरमाता अनुराधा गोरे (Anuradha Gore) आणि समाजसेविका डॉ. मंजू लोढा (Dr. Manju Lodha) यांच्या नेतृत्वात मंगळवारी भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ महिलांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात प्रथमच सिंदूर यात्रा आयोजित करण्यात आली होती.
मणीभवन चौक ते हिरोज ऑफ किलाचंद उद्यान दरम्यान निघालेल्या यात्रेत देण्यात आलेल्या राष्ट्रभक्तीच्या घोषणांनी गिरगाव परिसर दणाणून गेला. काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात निरपराध पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले. भारतीय सैनिकांनी दहशतवादविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून दहशतवादाला पुरस्कृत करणाऱ्या पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले.
या पार्श्वभूमीवर भारतीय सैनिकांच्या सन्मानाप्रित्यर्थ वीरमाता अनुराधा गोरे आणि समाजसेविका डॉ. मंजू लोढा यांच्या नेतृत्वात गिरगाव परिसरात सिंदूर यात्रा काढण्यात आली. या यात्रेत लाल साड्या परिधान करून हजारो महिलांनी हातात राष्ट्रध्वज घेत देशभक्तीपर घोषणांसह सहभाग घेतला. महाराष्ट्रात प्रथमच महिलांच्या नेतृत्वात भारतीय सैनिकांना मानवंदना देण्यासाठी सिंदूर यात्रा आयोजित करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना वीरमाता अनुराधा गोरे म्हणाल्या, “शहिदांचे बलिदान कधीही वाया जात नाही, तर त्यातून अनेक वीर तयार होतात. भारत ही वीरांची भूमी आहे आणि नारीशक्तीने त्यांच्या सदैव पाठीशी उभे रहायला हवे.”
यावेळी डॉ. मंजू लोढा म्हणाल्या की,” भारतीयांचे आपल्या सैन्यावर जीवापाड प्रेम आहेच, पण एवढे करून चालणार नाही प्रत्येक नागरिकाने वर्षातला एक सण जवानांच्या घरी त्यांच्या कुटुंबियांसह साजरा केला पाहिजे. त्यामुळे सीमेवर तैनात असलेल्या जवानांचे आत्मबळ वाढेल. या सिंदूर यात्रेवेळी कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनीही सहभाग घेऊन शूर भारतीय सैनिकांना मानवंदना दिली.
एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, पुणे शहर अध्यक्षपदी रवींद्र धंगेकरांची नियुक्ती
जवानांचे कुटुंबीय, माजी सैनिक, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, अभिनेत्री मेघा धाडे, मराठी चित्रपटसृष्टीतील इतर कलाकार तसेच विविध वयोगटांतील महिलांनी यात भाग घेतला.