Vishwambar Chaudhari : पुण्याच्या प्रश्नांवर भाजप कधी ‘जनआक्रोश मोर्चा’ काढणार
पुणे ः पुण्यात भाजप नेत्यांनी रविवारी ‘जनआक्रोश मोर्चा’ काढला होता. परंतु, लव-जिहाद पुण्यात नेमके किती झाले. तसेच पुण्यात धर्मांतरं किती झाली याची कोणतीही आकडेवारी नसताना त्यांनी हा मोर्चा काढला. मात्र, वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या पुणे (Pun) शहरातील महत्वाच्या प्रश्नांवर भाजप (BJP) कधी जनआक्रोश मोर्चा काढणार आहे, असा सवाल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वंबर चौधरी (Vishwambar Chaudhar) यांनी केला आहे.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वंबर चौधरी यांनी पुण्याच्या प्रश्नांबाबत फेसबुक पाेस्टद्वारे आपल्या भावना मांडल्या. पुण्याच्या प्रश्नांवर त्यांना आव्हान आहे की ‘जनआक्रोश मोर्चा’ काढून दाखवावा. कारण मुठा नदी किती प्रदूषित आहे त्याची आकडेवारी आम्ही देतो. पुलावरून चालताना नाक धरून चालावे लागते. महापालिकेत यांच्या काळात किती पैसा खाल्ला ते पुणेकर सांगतील.
तसेच आसपासचे रहिवाशी चोवीस तास त्रस्त असताना वैकुंठ स्मशान भूमीची एक चिमणी बदलण्यात सुद्धा हे अयशस्वी ठरले, या मुद्द्यावर वैकुंठच्या आसपास मोठा जनआक्रोश आहे. पर्वती मोकळा श्वास घेऊ शकत नाही त्यावरही मोठा जनआक्रोश आहे. शहरात सांडपाण्याची प्रक्रिया ठीक होत नाही असे उच्च न्यायालयाने म्हणलंय, त्यावरही लोक आक्रोश करत आहेत. या शहरात वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. सकाळ-संध्याकाळ लोक आक्रोश करत मनपाला शिव्या घालत आहेत. दररोज वेगळे फुटपाथ बांधून नेते, अधिकारी, कंत्राटदार पैसे खातात त्यावर जनआक्रोश आहे. एकाही नगरसेवकाने एकही वाॅर्डसभा घेतली नाही त्यावर आमचा आक्रोश आहे. अशी मोठी यादी देता येईल. भाजपाचे स्थानिक महान नेते यावर जनआक्रोश मोर्चा कधी काढणार आहेत, याची आम्ही वाट पाहत आहे.