वड्याचे तेल वांग्यावर, हे काम ठाणे महानगरपालिकेचे नव्हे

  • Written By: Published:
वड्याचे तेल वांग्यावर, हे काम ठाणे महानगरपालिकेचे नव्हे

ठाणे : कळव्यामधील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाची स्थिती ही काय आज वाईट झालेली नाही. वर्षेनुवर्षे या रुग्णालयाची अवस्था अत्यंत बिकटच होत गेली. खरतरं इतक्या उत्कृष्ट अन् मोठ्या जागेत फार सुंदर असे रुग्णालय चालवता आले असते. पण, माझे आजहीच हेच म्हणणे आहे की, ठाणे महानगरपालिकेचे उत्पन्न पाहता आणि गेल्या काही वर्षांतील या रुग्णालयाची अवस्था पाहता हा खर्च नक्की जातो कुठे ? हेच समजत नाही. अनेकवेळा याबद्दल बोलून देखिल याकडे लक्ष दिले गेले नाही. साधी इंजेक्शनची सुई हॉस्पिटलमध्ये नाही, तसेच तापाचे औषध नाही. रुग्णालयामध्ये परिचारीका, कर्मचारी किती याचा देखिल ताळमेळ नाही.

मग, जबाबदारी कोणाची ? रुग्णालयाच्या (अधिष्ठाता) डीन ची. डीन हे देखिल पगारी नोकरच आहेत. हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागामध्ये अॅिडमिट करणा-या रुग्णांसाठी ज्या कामासाठी तो अॅडमिट झाला आहे, त्याच्यावर वैद्यकीय उपचार करणारे डॉक्टर देखिल उपलब्ध नाहीत. याचा कधी कोणी विचार केला आहे का ? कारण, ज्या रुग्णालयाशी संलग्न वैद्यकीय महाविद्यालय असतं, त्या रुग्णालयामध्ये विविध प्रकारच्या लहान-मोठ्या शस्त्रक्रिया होऊन त्यामधून विद्यार्थी शिकत असतं. पण, विद्यार्थ्यांना शिकायला या ठिकाणी शस्त्रक्रियाच होत नाहीत. कुठल्याही प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया करण्यासाठी आयत्यावेळेस रुग्णांना सांगितले जाते की, के. ई. एम. रुग्णालयात जा.. किंवा सायन रुग्णालयात जा… हे कोणाकडे तरी बोट दाखवण्याचे प्रकरण नाही का ? नको ती जबाबदारी अंगावर घेतल्यामुळे हे दिवस पहावे लागतात.

मी जेव्हा 2014 साली महाराष्ट्र राज्याचा वैद्यकीय शिक्षण मंत्री होतो, तेव्हा मी ठाणे महानगरपालिके सोबत चर्चा केली होती की, तुम्ही हे हॉस्पिटल शासनाच्या ताब्यात द्या आणि शासन हे हॉस्पिटल चालवेलं. जेणेकरुन माझी एवढीच इच्छा होती की, ठाणे महानगरपालिकेच्या खर्चाचा भार कमी होईल. एकदा शासनाने लक्ष दिले की, वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय जिथे-जिथे एकत्र आहे तिथे-तिथे शासनाने कायम लक्ष देऊन त्या हॉस्पिटलचा स्टाफ तरी व्यवस्थित ठेवलेला आहे असा माझा अनुभव आहे.

Sanjay Raut : केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करुन आमचं संघटन तोडलं… 

आता तर स्वत: मुख्यमंत्री ठाण्याचे आहेत. आजही माझी हिच मागणी आहे की, हे हॉस्पिटल शासनाने ताब्यात घ्यावे. शासनाने उत्तमोत्तम सोयी या ठिकाणी द्याव्यात. ह्या हॉस्पिटलची ठाणेकरांना नितांत गरज आहे. कारण, ठाण्यामध्ये गोर-गरीब माणूस जर आजारी पडला तर त्याला औषधोपचारासाठी दुसरी जागाच नाहीये. त्यामुळे ‘वड्याचं तेल वांग्यावर काढू नका’. जे ठाणे महानगरपालिकेने करायला पाहिजे होते. त्यांनी जी व्यवस्था तिथे पुरवायला पाहिजे होती त्यांनी ती पुरवली नाही. कोणिही गांभीर्याने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाकडे लक्ष दिले नाही. फक्त त्या तीन महिला अचानक मुख्यमंत्र्यांच्या समोर आल्या त्यांनी त्यांना अडवलं. आणि सोयी सुविधांबाबत जाब विचारला. अर्थात, मुख्यमंत्र्यांना असे अडविणे कदाचित गुन्हाही असेल. पण, त्यांनी गोरगरीब रुग्णांच्या व्यथांना वाचा फोडली. कदाचित त्यामुळे या पुढे रूग्णांना काही दिवस सुविधा मिळतीलही, पण या सुविधा कायमस्वरूपी मिळतील का याबाबत साशंकताच आहे.

म्हणूनच त्या गोरगरीब महिलांनी केलेली अडवणूक हा विषय अहंकाराचा न करता मुख्यमंत्र्यांनी फक्त ठाणेकरच नव्हे तर जिल्ह्य़ातील गोरगरीब रूग्णांचा विचार करून हे रूग्णालय ठाणे पालिकेच्या ताब्यातून राज्य शासनाने स्वतःकडे घ्यावे. जेणेकरून ठाणे पालिकेवरील खर्चाचा बोजा कमी होईलचःशिवाय, येथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचेही भले होईल आणि ठाणेकर रुग्णांचे देखिल भले होईल. ज्या प्रकारे ससून, के. ई. एम. आणि जे. जे. रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया होतात तशाच प्रकारच्या शस्त्रक्रिया ठाण्यात देखिल व्हायला पाहिजेत. त्यांच्यापेक्षा मोठी जागा आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यांच्यापेक्षा चांगल्या पायाभूत सोयी सुविधा आपल्याकडे आहेत. पण, सगळं उंदरांनी खाल्ल्ल्यामुळे… आता हे उंदीर कोण ?कळव्यातील हे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय चालवणं ठाणे महानगरपालिकेचे काम नाही. असे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube