संदीप देशपांडेंच्या FIR मधील ठाकरे, वरुण कोण? पोलिसांचं मोठं पाऊल

संदीप देशपांडेंच्या FIR मधील ठाकरे, वरुण कोण? पोलिसांचं मोठं पाऊल

मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्यावर आज सकाळी मुंबईत प्राणघातक हल्ला (Mumbai Crime) करण्यात आला होता. या संदर्भात संदीप देशपांडे (Sandip Deshpande Attack) यांनी पोलीसांत जाऊन तक्रार दाखल केली होती. दाखल केलेल्या एफआयआरमध्ये धक्कादायक नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये ठाकरे आणि वरुण अशी नावे समोर आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

संदीप देशपांडे यांनी स्वतः पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यांनी आपल्या जबाबात हल्लेखोरांनी ठाकरे आणि वरुण अशी दोन नावं घेतल्याचं सांगितलं आहे. पण हे ठाकरे आणि वरुण नेमके कोण हे स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलीसांनी ८ पथकं तयार केली आहेत.

संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्यानंतर काही राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया देताना शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांचा उल्लेख केला होता. त्यामुळे संदीप देशपांडेंच्या FIR मधील ठाकरे, वरुण कोण? यांची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

देशपांडे यांनी जबाबात काय म्हटलंय?

“मी ‘महाराष्ट नवनिर्माण सेना’ या पक्षाचा सरचिटणीस व प्रवक्ता आहे. मी दररोज सकाळी शिवाजीपार्क मैदानात मॉर्निंग वॉक करतो. सकाळी 6.45 वा. च्या सुमारास घरातून निघतो. माझे मित्र संतोष धुरी, सुरेश तारकर व नितीन भिंगार्डे हे दररोज माझ्यासोबत मॉर्निंग वॉकला असतात. आज सकाळी 6.50 वा. च्या दरम्यान घरातून मॉर्निंग वॉकसाठी शिवाजीपार्क मैदानाकडे निघालो.

मैदानाचे गेट नं. 5 वर पोहोचल्यावर मी घड्याळ पाहिले तेव्हा 7.00 वाजले होते. माझे मित्र संतोष धुरी, सुरेश तारकर व नितीन भिंगार्डे हे तोपर्यंत आले नव्हते. म्हणून मी एकट्यानेच वॉक सुरू केला. गेट नं. 5 समोर जॉगिंग ट्रॅकवर डावीकडे बळुन मी मीनाताई ठाकरे पुतळ्याच्या दिशेने चालत गेलो.

मैदानाचा एक राऊंड पूर्ण करून सी. रामचंद्र चौकाकडून मैदानाचे गेट नं. 5 कडे आलो. त्यावेळी अंदाजे 7.15 वाजले असतील, गेट नं. 5 पास करून थोडा पुढे गेलो असताना कुणीतरी मागून माझ्या उजव्या पायाचे मांडीवर कोणत्यातरी टणक वस्तूने जोरात फटका मारला म्हणून मी लगेच मागे वळून पाहिले असता तीन/चार तरूण होते. त्यांच्या हातात लाकडी स्टंप व बँट होते.

त्यांनी मला हातातील स्टंप व बँटने मारहाण केली. त्यांचपैकी एकजण माझे डोक्यावर बँट मारत असताना मी हात मध्ये धरला त्यामुळं मी वाचलो परंतू हातावर जोरात प्रहार झाला व मी खाली पडलो. मी पडल्यावरही त्यांनी मला स्टप व बँटने मारहाण केली. मारहाण करताना ते मला शिवीगाळ करत “तुझं खूप झालं, पत्र लिहीतोस का भडव्या? ठाकरेंना नडतोस का? वरूणला नडतोस का?” असे बोलले.

Pravin Darekar : होळीच्या निमित्ताने शिवसेना संपवायचे विचार त्यांच्या मनातून जावेत

ते मला मारहाण करीत असताना मॉर्निंग वॉक करणारे लोक मला सोडविण्यासाठी जवळ येत असताना त्यांनी लोकांना मोठमोठ्याने “साले कोणी मध्ये याल तर, तुम्हालाही मारून टाकु”, असे बोलून आरडाओरडा करून दहशत निर्माण केली. त्यामुळे घाबरून मॉर्निंग वॉक करणाऱ्या लोकांची पळापळ झाली. भीतीने कोणी माझ्या मदतीला आले नाही. ते लोक मारहाण करून राजा बड़े चौकाच्या दिशेने पळत गेले. ते लोक गेल्यानंतर माझे मित्र ललित महाडिक व इतर लोक माझ्याजवळ आले.

ललित महाडिक यांनी मला उपचारासाठी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टरांनी मला तपासुन उपचार केले. मारहाणीमध्ये माझा उजवा हात फ्रेंक्चर झाला असल्याचे डॉक्टरांनी मला सांगितले, माझे डाव्या पायाला गुडघ्याच्या खाली दुखापत झाली असुन, उजव्या पायावर व इतरत्र मुक्का मार लागला आहे.

मारहाण करणाऱ्या तरुणांचं वर्णनही संदीप देशपांडे यांनी आपल्या जबाबाबात दिलं असून ते पुन्हा समोर आले तर त्यांना ओळखू असंही म्हटलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube