Praful Patel : शरद पवार पंतप्रधान का झाले नाहीत? प्रफुल पटेलांनी सांगितली इतिहासातील गोष्ट
Praful Patel : देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचं स्वप्न अजूनही पू्र्ण झालेलं नाही. पंतप्रधानपदाची संधी त्यांच्याकडे चालून आली होती. मात्र हातात असतानाही त्यांनी ती संधी घेतली नाही, असे प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी सांगितले. कर्जत खालापूर येथे राष्ट्रवादीच्या (NCP) अजित पवार गटाचे दोन दिवसीय शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात पटेल यांनी हा दावा केला. त्यांच्या या दाव्यानंतर राज्याच्या राजकारणात नवी चर्चा सुरू झाली आहे.
पटेल म्हणाले, अजित पवार मुख्यमंत्री आणि शरद पवार देशाचे पंतप्रधान व्हावेत अशी आमची इच्छा होती. नरसिंह राव यांना हटविण्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न केले. परंतु, त्यावेळी सीताराम केसरी यांना काँग्रेसचे अध्यक्ष करण्यात आले. त्यानंतर पुढे एचडी देवेगौडा पंतप्रधान झाले.परंतु केसरींनी त्यांचा पाठिंबा काढून घेतला. त्यानंतर 135 पेक्षा जास्त खासदार शरद पवार यांना येऊन भेटले. तुम्ही केसरींना हटवा अशी विनंतीही त्यांनी केली होती. पण, मला देवेगौडा यांचा फोन आला. मी त्यांच्या घरी गेलो. त्यावेळी देवेगौडा यांनी मी राजीनामा देतो पण केसरींना हटवा. शरद पवार यांना काहीतरी भूमिका घ्यायला सांगा असा निरोप माझ्याकडे दिला.
‘तेव्हाच’ आमदारांच्या पाठिंब्याने एनडीएमध्ये सहभागी झालो, प्रफुल पटेल यांचा दावा
या सगळ्या घडामोडी होत असताना मी शरद पवार यांना स्पष्ट शब्दांत सांगितलं की आपल्याला मोठी संधी चालून आली आहे. त्यामुळे आता तुम्ही भूमिका घ्या. पण त्यांनी पंधरा मिनिटांत बैठक आटोपती घेत आपण नंतर बोलू असे सांगितले. त्यावेळी त्यांना काय झालं मला माहिती नाही. परंतु, पंतप्रधान होण्याची सुवर्णसंधी मात्र घालवली. शरद पवार पंतप्रधान झाले असते. ते पंतप्रधान झाले नाहीत, याची खंत माझ्या मनात कायम राहिल असे प्रफुल पटेल यावेळी म्हणाले.
पवार 2004 सालीच भाजपासोबत जाणार होते…
शरद पवार पहिल्यांदा भाजपसोबत जाणार होते. 2004 साली प्रमोद महाजन आणि आम्ही एकत्र येण्यासंदर्भात चर्चा केली. दिल्लीत माझ्या घरी ही बैठक झाली होती. लालकृष्ण अडवाणी आणि अलटबिहारी वाजपेयी यांच्या सूचनेनूसार ही मिटींग झाली होती, पण प्रमोद महाजन यांना ही युती नको होती. शरद पवार यांचे वजन वाढेल म्हणून प्रमोद महाजन यांना हे नको होते. त्यामुळे महाजनांनी ही बातमी बाळासाहेब ठाकरेंना दिली. ठाकरेंकडून पवारांवर आरोप होताच पवार-भाजप युती होऊ शकली नसल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं आहे.
Sharad Pawar : चंद्रकांत पाटलांना नक्की कळेल पण, निवडणुकीनंतर.. शरद पवारांनी नेमकं काय सांगितलं?