बेफाम वेग आणि चालकाचा निष्काळजीपणा; भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू, 25 जखमी
अपघातात 10 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 25 हुन अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर, मृतांचा आकडा वाढण्याची भीती.
10 people died in a terrible accident : बिहारमधील कटिहार जिल्ह्यात शनिवारी संध्याकाळी एक भीषण रस्ते अपघात झाला असून या दुर्घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. कोईरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्ग 31 वर दातपूर मुसाहारी चौकाजवळ बस आणि पिकअप व्हॅनची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात 10 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 25 हुन अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अपघातग्रस्त बस हरदाहुन पुर्णीकडे प्रवास करत होती. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार बस चालक दारूच्या नशेत होता आणि वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस वेगाने धावत होती. मार्गात बसने काही इतर वाहनांना देखील धडक दिल्याचे सांगितले जात आहे. अखेर दातपूर मुसाहरी चौकाजवळ समोरून येणाऱ्या पिकअप व्हॅनला बसने जोरदार धडक दिली आणि हा भीषण अपघात झाला.
बसची धडक एवढी तीव्र होती की, रस्त्यावरून जाणाऱ्या दोन दुचाकी देखील या अपघाताच्या कचाट्यात सापडल्या. त्या दुचाकींवरील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तसेच बसमधील प्रवाशांना देखील मोठ्या प्रमाणात दुखापती झाल्या असून काहींचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात एकचं हाहाकार माजला. जखमींच्या किंकाळ्या आणि मदतीसाठीचा आक्रोश दूरवर ऐकू येत होता. स्थानिक ग्रामस्थ्यांनी कोणतीही वेळ न दवडता घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. अपघातग्रस्त वाहनांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.
मोठी बातमी! ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, आपत्कालीन सेवा आणि रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले. काही गंभीर जखमींना इतर शहरांमध्ये हलवण्याची तयारी सुरू आहे. दरम्यान, या भीषण अपघातामुळे राष्ट्रीय महामार्ग 31 वर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. नंतर पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आणि वाहन चालवताना विशेष दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या अपघातामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रशासनाकडून मदत आणि नुकसानभरपाईबाबतही लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.