Actor To Politics : NTR, MGR अन् आता ‘विजय’… रुपेरी पडद्यावरून थेट सत्तेच्या सिंहासनावर जाणारे अभिनेते !
Vijay : राजकारणात पहिल्याच निवडणुकीत विजय मिळवून मुख्यमंत्री बनणाऱ्या सुपरस्टार्सच्या यादीत आता विजयचे नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले जाणार आहे.
Actors Turned Politicians First Time Victory History : भारतीय राजकारणात सिनेमा आणि सत्ता यांचे नाते जुने आहे, पण काही अभिनेते असे असतात जे केवळ निवडणुका लढवत नाहीत, तर पहिल्याच प्रयत्नात इतिहास बदलून टाकतात. 4 मे 2026 रोजी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येत असताना, ‘थलपती’ विजयने तोच करिश्मा करून दाखवला आहे जो दशकभरापूर्वी एन.टी. रामाराव (NTR) आणि एम.जी. रामचंद्रन (MGR) यांनी केला होता. NTR, MGR आणि आता विजय या तिन्ही नायकांनी सिनेसृष्टीतील ‘सुपरस्टार’ ते राजकारणातील ‘जननायक’ हा प्रवास पहिल्याच फटक्यात कसा जिंकला, याचे हे रंजक विश्लेषण.
‘नान उंगल वेत्तू पिल्लैयागा इंगे निकिरेन’ याच शब्दांनी विजय तामिळनाडूतील निवडणुकांमध्ये बनला ‘थलपती’
1. एम.जी. रामचंद्रन (MGR) : द्रविडीयन राजकारणाचा पहिला ‘सुपर किंग’
तामिळनाडूच्या राजकारणात सिनेमॅटिक क्रांतीची सुरुवात खऱ्या अर्थाने एम.जी.आर. यांनी केली. 1972 मध्ये डीएमकेमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी ‘एआयएडीएमके’ (AIADMK) स्थापन केला. पक्ष स्थापनेनंतरच्या 1977 च्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत एमजीआर यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात आणि गरिबांच्या कल्याणासाठी आवाज उठवला. पडद्यावरची त्यांची ‘गरीब रक्षक’ ही प्रतिमा त्यांनी ‘मध्यान्ह भोजन’ सारख्या योजनांनी प्रत्यक्षात उतरवली. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी सत्ता हस्तगत केली आणि शेवटच्या श्वासापर्यंत तामिळनाडूच्या मनावर राज्य केले. 1977 च्या पहिल्याच निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून मुख्यमंत्री बनले होते. Actors Turned Politicians First Time Victory History
2. एन.टी. रामाराव (NTR) : 9 महिन्यांत आंध्र प्रदेश सर करणारा ‘दैवी’ नायक
आंध्र प्रदेशच्या राजकारणात एन.टी. रामाराव यांनी जे केले, त्याला जगात तोड नाही. 9 महिने आधी पक्ष (तेलगू देसम पार्टी) काढला आणि थेट मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. 1983 मध्ये पहिली निवडणूक लढवत त्यांनी ‘तेलगू आत्मसन्मान’ (Telugu Vari Atma Gauravam) या एका मुद्द्यावर संपूर्ण आंध्र प्रदेश पिंजून काढला. पडद्यावर कृष्ण आणि रामाच्या भूमिका करणाऱ्या NTR यांना जनतेने देवाचा दर्जा दिला होता. ‘2 रुपये किलो तांदूळ’ या घोषणेने गरिबांना आपलेसे केले आणि काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला पहिल्याच प्रयत्नात सुरुंग लावला होता.
तामिळनाडूत ‘थलपती’ नावाचा ‘ब्लॉकबस्टर’; क्लायमॅक्समुळे राजकीय चाणक्यही गारद
3. ‘थलपती’ विजय : डिजिटल युगाचा नवा ‘वेत्री’ (विजय)
आता 2026 मध्ये विजयने या दिग्गज नेत्यांच्या पंक्तीत आपले स्थान निश्चित केले आहे. विजयचा विजय हा आधुनिक राजकारणातील एक मोठा चमत्कार मानला जात आहे. विजयने यंदाची म्हणजेच 2026 मधील पहिल्याच निवडणुकीत आपल्या ‘तमिझगा वेत्री कझगम’ (TVK) च्या माध्यमातून कोणाशीही युती न करता सर्व 234 जागा लढवल्या आणि मोठा विजय मिळवला. NTR आणि MGR प्रमाणेच विजयनेही ‘तमिळ अस्मिता’ आणि ‘गरीब कल्याण’ हेच मुद्दे केंद्रस्थानी ठेवले. ‘पिरप्पुक्कम एल्ला उयिरक्कुम’ (जन्माने सर्व समान आहेत) या घोषणेने त्याने जनतेला भावनिक साद घातली.
तिघांच्या विजयातील ‘कॉमन’ सूत्रे कोणती?
| वैशिष्ट्ये | एम.जी. रामचंद्रन (MGR) | एन.टी. रामाराव (NTR) | थलपती विजय |
| प्रतिमा | गरिबांचा कैवारी | तेलगू अस्मितेचा रक्षक | घरचा मुलगा / जननायक |
| मुख्य मुद्दा | भ्रष्टाचार निर्मूलन | प्रादेशिक स्वाभिमान | सामाजिक न्याय आणि रोजगार |
| पक्षाची ताकद | फॅन क्लबचे रूपांतर पक्षात | ९ महिन्यांत झंझावाती प्रचार | ‘मक्कल इयक्कम’चे केडर |
| निकाल | पहिल्याच प्रयत्नात मुख्यमंत्री | पहिल्याच प्रयत्नात मुख्यमंत्री | पहिल्याच प्रयत्नात ‘किंगमेकर’ ते मुख्यमंत्री |
पश्चिम बंगालमध्ये सत्तासंग्राम, भाजप बहुमताच्या उंबरठ्यावर, ‘M फॅक्टर’ ठरतोय निकालाचा खरा किंगमेकर
सिनेमाच्या पलीकडचा ‘विजय’
NTR आणि MGR यांनी दाखवून दिले होते की, जर जनतेला तुमच्या प्रामाणिकपणावर विश्वास असेल, तर प्रस्थापित सत्ता उलथवून लावणे कठीण नाही. आज विजयने देखील तेच करून दाखवले आहे. तामिळनाडूच्या जनतेने हे सिद्ध केले आहे की, त्यांना केवळ ‘स्टार’ नकोय, तर त्यांच्या दुःखात धावून येणारा एक ‘मुलगा’ हवा आहे. विजयचा हा विजय म्हणजे केवळ एका निवडणुकीचा निकाल नाही, तर तामिळनाडूच्या राजकीय इतिहासातील एका ‘सुवर्ण युगाची’ सुरुवात आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, “दक्षिण भारताचे राजकारण नेहमीच ‘हिरो वॉरशिप’ (नायक पूजा) आणि ‘लोककल्याणकारी योजना’ याभोवती फिरत आले आहे. विजयने नेमकी हीच नस ओळखली. NTR आणि MGR प्रमाणेच विजयनेही जनतेला हा विश्वास दिला की, तो पडद्यावरचा नायक नसून त्यांच्या हक्कासाठी लढणारा खऱ्या आयुष्यातील सेनापती आहे.