60 एकरात मंडप, 4 लाख पाहुणे, डिफेंडर अन् बरंच काही….’बाहुबली’च्या मुलीचा शाही लग्नसोहळा!
बिहारचे बाहुबली आमदार अनंत सिंग यांची दुसरी कन्या शिवांगीच्या शाही विवाह सोहळ्याची जय्यत तयारी सुरु असून या विवाहाची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
Anant Kumar Singh : तब्बल 60 एकरामध्ये मंडप, 4 लाखांपेक्षा जास्त पाहुणेमंडळी, लग्नात पारंपारिक जेवणासह इतर राज्यांतील 150 मेनूंचा स्वाद आणि जावयाला डिफेंडर गाडी भेट…होयं. हे पुढील 15 दिवसांत घडणार आहे बिहारच्या पैतृक गावात. निमित्त ठरलंय, बिहारचे बाहुबली म्हणून ओळखळे जाणारे आमदार अनंत सिंग (Anant Kumar Singh) यांच्या मुलीचा लग्न सोहळ्याचं. सध्या बिहारकरांचं लक्ष लागलंय ते म्हणजे येत्या 25 नोव्हेंबरला बाहुबलीच्या मुलीचा शाही सोहळा कसा होणार? याकडे. आमदार अनंत सिंग यांची दुसरी कन्या शिवांगी सिंग हिचा विवाह सोहळा 25 नोव्हेंबरला पार पडणार आहे. या शाही सोहळ्याची जोरदार लगबग सुरु असून विवाह सोहळ्याची तयारी कशी? अनंत सिंग यांचे जावई कोण आहेत? सविस्तर पाहुयात…
Letsupp दिवाळी अंक 2026 महाराष्ट्रात कुठेही मागवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
विदेशातून सजावटीसाठी आकर्षक फुले…
बिहारच्या पैतृक गावात सध्या शाही विवाह सोहळ्याची लगबग सुरु आहे. सजावटीसाठी परदेशातून आकर्षक फुले मागवण्यात येत आहेत, तर घोड्यांच्या शर्यतीसाठी एक मोठं मैदान तयार करण्यात आलंय. या शाही विवाह सोहळ्यासाठी पारंपारिक जेवणासह विविध राज्यांमधील स्वादिष्ट पदार्थांची खास मेजवानीचे आयोजन पाहुणे मंडळींसाठी करण्यात आलंय. विवाह सोहळ्यासाठी तब्बल 4 लाख पाहुण्यांची व्यवस्था करण्यात आली असून पाहुण्यांसाठी 150 पेक्षा अधिक पदार्थ तयार केले जाणार आहेत.
अनंत सिंग यांचा जावई कोण?
आमदार अनंत सिंग आणि माजी आमदार नीलम देवी यांना दोन मुली आहेत. मोठी मुलगी राजनंदनी सिंग हिचा विवाह केंद्रीय सेवेत अधिकारी असलेल्या कुमार पुनीत यांच्याशी झाला. तर दुसरी मुलगी शिवांगी सिंगचा विवाह पाटण्यातील ऋषिकेश कुमार यांच्याशी ठरलायं. ऋषिकेश भारतीय सैन्यात कमांडंट असलेले रणविजय सिंग यांचा मुलगा आहे. ऋषिकेश अमेरिकेत राहत असून, त्याने जॉर्जिया स्टेट युनिव्हर्सिटीमधून एमबीएचं शिक्षण पूर्ण केलंय.
जावयाला डिफेंडर गाडी भेट…
शाही विवाह समारंभात दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूंबाबतही मोठी चर्चा सुरू आहे. अनंत सिंग आपल्या भावी जावयाला करोडो रुपये किमतीची ‘डिफेंडर’ गाडी भेट म्हणून देणार असल्याची माहिती समोर आलीयं. डिफेंडर गाडीच्या भेटीबाबत अनंत सिंग यांच्याकडून अधिकृत जाहीर करण्यात आलेले नाही मात्र माध्यमांच्या माहितीनुसार डिफेंडर गाडी भेट दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या शाही सोहळ्याची देशभरात चर्चा रंगलीयं.
दुलारचंद यादव हत्याकांड प्रकरणी अनंत सिंग यांना अटक…
दुलारंचद यादव हत्याकांड प्रकरणी आमदार अनंत सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाने शरण येण्याचे आदेश दिले आहेत. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान झालेल्या वादात दुलारचंद यादव यांची हत्या झाली होती. त्यानंतर 1 नोव्हेंबर 2025 रोजी अनंत सिंग यांना अटक झाली.
माजी मुख्यमंत्री नितीश कुमारांची सोहळ्याला उपस्थिती…
शाही विवाह सोहळ्याला बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीश कुमार, आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांच्यासह अनेक दिग्गज राजकीय नेत्यांना निमंत्रित करण्यात आलंय. तसेच भोजपुरी मनोरंजन क्षेत्रातील काही प्रसिद्ध व्यक्तींनाही निमंत्रणे देण्यात आली असून प्रामुख्याने सोनू सूद, पवन सिंग, मनोज तिवारी आणि गुंजन सिंग यांचा समावेश असल्याचं अनंत सिंग यांनी सांगितलंय.
दरम्यान, बिहारमध्ये अनंत सिंग यांच्या मुलीच्या लग्नाबाबत संपूर्ण परिसरात मोठी उत्सुकता लागून राहिली असून 25 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या भव्य सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.