Video : सहा पिढ्या, 83 सदस्य अन् एकच छत; ‘हम साथ-साथ हैं’ सिनेमाला मागे टाकणारी खरी स्टोरी

Joint Family १९९९ मध्ये आलेल्या 'हम साथ-साथ हैं' चित्रपटात रामकिशन आणि ममता यांचे हसते-खेळते एकत्र कुटुंब पाहून अनेकांना हेवा वाटला होता.

  • Written By: Published:
Andhra Pradesh Nagappa Joint Family

Six Generations, 83 Members Nagappa Joint Family Story : 1999 साली आलेल्या ‘हम साथ-साथ हैं’ या चित्रपटाने संयुक्त कुटुंब म्हणजे काय, एकोपा म्हणजे काय आणि नाती कशी जपायची याचं सुंदर चित्र प्रेक्षकांसमोर उभं केलं होतं. रामकिशनच्या कुटुंबात सुख-दुःख, सण-उत्सव आणि प्रेमाची उब पाहून अनेकांना असं कुटुंब आपल्यालाही असावं असं वाटलं होतं. मात्र चित्रपट संपला आणि ती गोष्ट पडद्यावरच राहिली. मात्र, आंध्र प्रदेशातील अनंतपूरमध्ये एक असे कुटुंब आहे, जे या चित्रपटालाही मागे टाकेल अशी खरीखुरी ‘हम साथ-साथ हैं’ ची गोष्ट जगत आहे. जिथे सहा पिढ्यांतील तब्बल 83 सदस्य एकत्र राहतात, एकत्र जेवतात, एकत्र काम करतात आणि प्रत्येक आनंद-दुःखही एकत्रच जगतात…  सध्या देशभर याच आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील खऱ्या हम साथ-साथ है म्हणत जगणाऱ्या नागप्पा कुटुंबाची चर्चा रंगली आहे.

‘हम साथ-साथ हैं’ची जिवंत झलक

आजच्या काळात जिथे भाऊ-भाऊ एकत्र राहणे कठीण झाले आहे, तिथे नागप्पा कुटुंबातील 83 सदस्य सहा पिढ्यांपासून एकोप्याने राहत आहेत. नोकरी, शिक्षण, करिअर आणि बदलती जीवनशैली यामुळे संयुक्त कुटुंबं वेगाने कमी होत आहेत. अशा वेळी नागप्पा कुटुंबाने अनेक दशकांपासून संयुक्त कुटुंबाची परंपरा जपली आहे. या कुटुंबात सहा पिढ्यांतील थोडी थोडकी नव्हे तर, तब्बल 83 सदस्य आहेत. एवढे सदस्य असल्यामुळे ते चार शेजारील घरांमध्ये राहतात. मात्र त्यांच्यासाठी ती चार घरं नसून एकच कुटुंब आहे. स्वयंपाक एकत्र, जेवण एकत्र, शेती एकत्र आणि निर्णयही एकत्र घेतले जातात.

जबाबदाऱ्याही वाटून घेतल्या अन् आनंदही

या कुटुंबाचा मुख्य व्यवसाय शेती आहे. पुरुष मंडळी एकत्र शेतात आणि इतर कामांवर जातात, तर महिला मिळून घर आणि स्वयंपाकाची जबाबदारी सांभाळतात. घरातील प्रत्येक काम ठरलेलं असल्याने कोणत्याही एका व्यक्तीवर संपूर्ण कुटुंबाचा भार पडत नाही. लहान मुलं एकत्र खेळतात, भांडतात आणि पुन्हा क्षणात एक होतात. घरातील ज्येष्ठ मंडळी अनुभवाच्या आधारावर पुढच्या पिढीला मार्गदर्शन करतात. त्यामुळे प्रत्येकाला कुटुंबाचा आधार मिळतो. आज संयुक्त कुटुंबाला अनेकदा बंधने मानले जाते, पण नागप्पा कुटुंबाने हे सिद्ध केले आहे की, हे बंधन नसून एक मोठी ताकद आहे. आज मोबाईल आणि सोशल मीडियाच्या जगात नाती दूर जात असताना, नागप्पा यांच्या कुटुंबांमधील संवाद आणि आपुलकी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

देशात ‘महाकुटुंबे’ अजूनही जिवंत

नागप्पा कुटुंब हे केवळ एक उदाहरण नाही. देशात अशा अनेक मोठ्या कुटुंबांची परंपरा आजही टिकून आहे. राजस्थानमधील अजमेर येथील रामसर गावात राहणारे ‘माली कुटुंब’ हे देखील एक मोठे उदाहरण आहे. या कुटुंबात तब्बल 185 सदस्य एकत्र राहतात आणि त्यांच्या घरी रोज 13 चुली पेटवल्या जातात.

चित्रपट संपला… पण ही गोष्ट अजूनही सुरू आहे…

‘हम साथ-साथ हैं’ हा चित्रपट प्रेक्षकांना संयुक्त कुटुंबाचं स्वप्न दाखवून गेला. पण आंध्र प्रदेशातील नागप्पा कुटुंबाने ते स्वप्न प्रत्यक्षात जगून दाखवलं आहे. बदलत्या काळातही नाती, परंपरा आणि एकोपा जपता येतो, हे या कुटुंबाने सिद्ध केलं आहे. आज विभक्त कुटुंबांची संख्या वाढत असताना सहा पिढ्या, 83 सदस्य आणि एकच कुटुंब ही केवळ एक बातमी नाही, तर भारतीय संस्कृतीतील ‘एकत्र राहण्याची ताकद’ जिवंत ठेवणारी प्रेरणादायी कहाणी आहे.

follow us