चिंता वाढली! देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये 2.5 पटीनं वाढ
नवी दिल्ली : देशभरात कोरोनानं (Corona)पुन्हा एकदा डोकं वर काढल्याचं दिसून येत आहे. देशभरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून असं दिसतंय की, साप्ताहिक चाचणीमध्ये कोरोना पॉझिटीव येण्याचा दर (TPR) 10 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असलेल्या जिल्ह्यांची संख्या आता 14 वरुन 32 पर्यंत वाढली आहे. याचा अर्थ कोविडबाधित जिल्हे अवघ्या दोन आठवड्यात 2.5 पटीने वाढले असल्याचं आकडेवारीवरुन दिसत आहे.
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, 19 ते 25 मार्च यादरम्यान देशातील 19 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 63 जिल्ह्यांमध्ये टीपीआर 5 ते 10 टक्के होता. दोन आठवड्यांपूर्वी फक्त 8 राज्यांतील 15 जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये संपूर्ण देशात चाचणी पॉझिटिव्ह दर पुन्हा एकदा वाढत आहे.
‘एक्सप्रेस वे’ वरील प्रवास महागला; टोलमध्ये 18 टक्क्यांची वाढ, असे असणार दर
त्यामुळे येत्या काळासाठी ही धोक्याची घंटा आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण (Rajesh Bhushan)यांनी गेल्या दोन महिन्यांत कोविड-19 च्या वाढत्या प्रकरणांवर चर्चा करण्यासाठी देशभरातील वरिष्ठ आरोग्य अधिकारी आणि डॉक्टरांची आभासी बैठक घेतली होती.
देशाची राजधानी दिल्लीमधील चार जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक कोरोना चाचणी सकारात्मक दर (टीपीआर) नोंदवण्यात आला आहे. यामध्ये दक्षिण दिल्ली 13.8 टक्के, पूर्व दिल्ली 13.1 टक्के, उत्तर-पूर्व जिल्हा 12.3 टक्के आणि मध्य दिल्ली 10.4 टक्के आहे.
वायनाडमध्ये 14.8 टक्के आणि केरळमधील कोट्टायममध्ये 10.5 टक्के, गुजरातमधील अहमदाबादमध्ये 10.7 टक्के आणि महाराष्ट्रातील सांगली आणि पुण्यात 14.6 टक्के नोंद झाली आहे.
हरियाणामध्येही पुन्हा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसते आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 68 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 31 जणांनी कोरोनावर मात केली आहे. गुडगावमध्ये सर्वाधिक 46 आणि फरीदाबादमध्ये 10 प्रकरणे नोंदवली आहेत. तर यमुनानगरमध्ये चार आणि पानिपत जिल्ह्यात तीन प्रकरणं नोंदवली आहेत.