2017 मध्ये राजकीय पदार्पण, 2023 मध्ये मायावतींचा उत्तराधिकारी : कोण आहे आकाश आनंद?

2017 मध्ये राजकीय पदार्पण, 2023 मध्ये मायावतींचा उत्तराधिकारी : कोण आहे आकाश आनंद?

लखनऊ : कांशीराम यांनी स्थापन केलेल्या बहुजन समाज पक्षाची धुरा आता 28 वर्षीय आकाश आनंद यांच्या हातात असणार आहे. पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी आकाश आनंद यांची त्यांचे उत्तराधिकारी म्हणून घोषणा केली. रविवारी (10 डिसेंबर) बसपाचे प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हा नेत्यांची विशेष बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी मायावतींनी ही मोठी केली. मागील काही दिवसांपासून त्या प्रकृती अस्वस्थामुळे सार्वजनिक जीवनातून बाजूला झाल्या होत्या. पूर्वीप्रमाणे निवडणूक सभांमध्येही त्या उपस्थित राहत नव्हत्या. या पार्श्वभूमीवर आकाश आनंदसारख्या तरुण चेहऱ्यावर मायावती यांनी मोठी जबाबदारी दिल्याचे बोलले जात आहे. (Bahujan Samaj Party chief Mayawati announced Akash Anand as her successor)

कोण आहे आकाश आनंद?

आकाश आनंद हे मायावतींचे बंधू आनंद कुमार यांचे सुपुत्र आहे. 1995 साली त्यांचा जन्म नोएडामध्ये झाला. त्यानंतर शालेय शिक्षण त्यांचे भारतातच झाले. मात्र उच्च शिक्षणासाठी त्यांनी इंग्लंड गाठले. त्यांनी लंडनमधून मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (एमबीए) चे शिक्षण घेतले आहे. 2016-2017 मध्ये भारतात परत आल्यानंतर त्यांनी बहुजन समाज पक्षात काम करण्यास सुरुवात केली. मायावतींनी त्यांना 2017 मध्ये सहारनपूरच्या सभेतून राजकारणात आणले होते. तेव्हापासून त्यांच्याकडे मायावतींचे उत्तराधिकारी म्हणून पाहिले जाऊ लागले होते.

जानेवारी 2019 मध्ये मायावतींनी आकाश आनंद यांच्या पक्षप्रवेशाबाबतची अधिकृत घोषणा केली. त्यावेळी त्यांना पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्षही बनविण्यात आले होते. मात्र घराणेशाहीवरील टीकेमुळे त्यांनी हे पद स्विकारण्यास नकार दिला. त्यानंतर ते महासचिव पदावर काम करु लागले. मायावती यांनी त्यांच्यावर विविध निवडणुकांची जबाबदारी सोपविली होती. 2022 मध्ये, हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी BSP च्या स्टार प्रचारकांच्या यादीत आनंदचे नाव दुसऱ्या क्रमांकावर होते.

बसपाचा नवा ‘बॉस’ ठरला! लोकसभा निवडणुकीपूर्वी मायावतींकडून उत्तराधिकाऱ्याची घोषणा

आकाश आनंद गेल्या 3 वर्षांपासून छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश आणि तेलंगणामध्ये पक्षाच्या राष्ट्रीय संयोजकासह सर्व जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी बहुजन समाज पक्षाचा जनाधार वाढविण्यासाठी बरेच प्रयत्न केले. याच प्रयत्नांचे फलित म्हणजे राजस्थानमध्ये भाजपचा मोठा विजय होऊनही बसपा 7 लाखांहून अधिक मते मिळवित राज्यात तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीतही बसपाला समाजवादी पक्षापेक्षा जास्त मते मिळाली. बसपाला राज्यात 14 लाखांहून अधिक मते मिळाली, त्याचवेळी सपाला दोन लाखही मते मिळाली नाहीत.

Sukhdev Singh Gogamedi : पाच दिवस गुंगारा दिला पण, ‘त्या’ फोटोने गोगामेडींचे मारेकरी झाले गजाआड

सर्व प्रादेशिक पक्षांपेक्षा लोकांनी बसपावर अधिक विश्वास दाखवला.आता मायावतींनी पक्षाचे होम ग्राऊंड असलेल्या उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडची जबाबदारी आकाश आनंद यांच्याकडे दिली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला समाजवादी पक्षासोबत युती करुन अवघ्या 10 जागा जिंकता आल्या होत्या. त्यामुळे त्यांची खरी परीक्षा 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत होणार आहे. त्यांना अखिलेश यादव आणि भाजपच्या दुहेरी आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. शिवाय पक्षाला पुन्हा सोनेरी दिवस दाखविण्याचे आव्हानही त्यांच्या समोर असणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube