IPS अधिकाऱ्याची अवघ्या 3 तासांत बदली; तुकाराम मुंढेंचाही मोडला रेकॉर्ड

IPS अधिकाऱ्याची अवघ्या 3 तासांत बदली; तुकाराम मुंढेंचाही मोडला रेकॉर्ड

उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये सध्या IPS प्रभाकर चौधरी यांची जोरदार चर्चा सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी ते बरेली जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहत होते. मात्र जिल्ह्यातील नवादा येथे कावड यात्रेकरुंवरील लाठीचार्ज प्रकरणी त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. चौधरी यांची मागील 13 वर्षांमधील ही 21 वी बदली ठरली आहे. तर आठ वर्षामधील 18 वी बदली ठरली आहे. दरम्यान, चौधरी यांची बदल्यांसंदर्भातील आकडेवारी पाहून, महाराष्ट्रातील सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची आठवण होतं आहे. मुंडे यांची 18 वर्षांमध्ये 22 वेळा बदली झाली आहे. (Prabhakar Chaudhary, Senior Superintendent of Police (SSP) Bareilly, Uttar Pradesh, transferred Sunday night and 21 times till date)

योगी सरकारने अत्यंत तडकाफडकी केलेल्या चौधरींच्या बदलीची सध्या देशभर चर्चा सुरु आहे. लाठीचार्ज झाल्यानंतर सरकार आणि प्रशासनावर होणाऱ्या टीकेला शांत करण्यासाठी अवघ्या 3 तासांतच चौधरी यांची बदली करण्यात आली. सायंकाळी सात वाजता कावड यात्रेकरुंवर लाठीचार्ज झाला होता. त्यानंतर मोठ्या प्रमाणात टीका सुरु होताच अवघ्या तीन तासांतच म्हणजे रात्री दहा वाजता त्यांच्या बदलीचे आदेश निघाले. दरम्यान, या बदलीनंतर त्यांचं डिमोशन केल्याचीही चर्चा आहे. त्यांना आता प्रादेशिक आर्म्‍ड कांस्टेबुलरीच्या 32 व्या तुकडीचे कमांडर म्हणून पाठविण्यात आलं आहे. यामुळे वरिष्ठ पोलीस अधिक्षकांच्या पदावरुन त्यांची उंची कमी केल्याचं बोललं जात आहे.

कोण आहेत प्रभाकर चौधरी?

प्रभाकर चौधरी हे 2010 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून ते मूळचे उत्तर प्रदेशमधील आंबेडकर नगर जिल्ह्यातीचे रहिवासी आहे. चौधरी पहिल्याच प्रयत्नात केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले. यात त्यांची आयपीएस म्हणून निवड झाली. त्यानंतर उत्तर प्रदेश केडरच त्यांना देण्यात आले. त्यांनी यापूर्वी देवरिया, बिजनौर, बलिया, बुलंदशहर आणि कानपूर ग्रामीणला पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे.

बिहारमध्ये पुन्हा जातनिहाय जनगणना होणार, पाटणा हायकोर्टाच्या निर्णयाचा बिहार सरकारला दिलासा

तर वाराणसी, मुरादाबाद, मेरठ आणि आग्रा येथे वरिष्ठ पोलीस अधीक्षक म्हणूनही काम केले आहे. मार्चमध्ये त्यांची बरेलीमध्ये बदली करण्यात आली. यापूर्वी मेरठमध्ये त्यांनी एक वर्ष काम केले आहे. हा त्यांचा एका ठिकाणी काम करण्याचा मोठा काळ मानला जातो. इतर जिल्ह्यांमध्ये प्रभाकर चौधरी यांना केवळ सहा ते सात महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण करता आला.

प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळख :

उत्तर प्रदेश पोलीस प्रशासनात प्रामाणिक अधिकारी म्हणून प्रभाकर चौधरी यांची ओळख आहे. त्यांची काम करण्याची शैलीही अनोखी आहे. 2021 मध्ये त्यांची मेरठला बदली करण्यात आली होती. मात्र पदभार स्वीकारण्यापूर्वी ते दोन दिवसांच्या रजेवर गेले. एखाद्या चित्रपटाप्रमाणे दोन दिवस त्यांनी सामान्य नागरिकाप्रमाणे संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेतला. पोलीस कुठे कमी पडत आहेत याबाबत अभ्यास केला आणि त्याआधारे आराखडा बनवून कामाला सुरुवात केली.

Manipur violence : सुप्रीम कोर्टाने मणिपूर पोलिसांना फटकारले, तुमच्या तपासाचा वेग संथपणे

साधेपणासाठी देखील चौधरी यांना ओळखलं जातं :

प्रभाकर चौधरी यांच्या साधेपणाची उत्तर प्रदेशमध्ये चर्चा होतं असते. देवरिया येथून कानपूर ग्रामीणला बदली झाल्यानंतर त्यांनी सरकारी वाहन सोडून दिले आणि बस पकडून कानपूर गाठले. तिथून रिक्षाने पोलीस अधिक्षकांच्या निवासस्थानी पोहोचले. साधे कपडे, खांद्यावर आणि हातात बॅग्ज या अवस्थेतील नवीन अधिक्षकांना सुरक्षा रक्षकांनी ओळखलेच नाही. तुम्ही कोण आहात, तुम्हाला कोणाला भेटायचे आहे? असे प्रश्न विचारले. मात्र ओळख सांगितल्यानंतर आणि ओळखपत्र दाखविल्यानंतर त्यांच्याकडे आश्चर्यचकित नजरेने पाहत बंगल्याचे गेट उघडण्यात आले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube