BBC : तेव्हा इंदिरा गांधींनी घातली होती बीबीसीवर बंदी, वाचा सविस्तर

BBC :  तेव्हा इंदिरा गांधींनी घातली होती बीबीसीवर बंदी, वाचा सविस्तर

ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन म्हणजेच  बीबीसी ( BBC )  या वृत्त संस्थेच्या दिल्ली व मुंबईच्या कार्यालयावर आज सकाळी आयकर विभागाने ( Income Tax )  धाड टाकली आहे. ही धाड नसून चौकशीसाठी सर्वे असल्याचे आयकर विभागाकडून सांगण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील ( Narendra Modi )  ‘इंडिया : द मोदी क्वेश्चन’  ही डॉक्यूमेंट्री प्रसिद्ध केली होती. या डॉक्यूमेंट्रीमध्ये 2002 साली झालेल्या गुजरात दंगलीच्या वेळेस मोदी मुख्यमंत्री असताना त्यातील घटनांचा शोध घेण्याचा दावा बीबीसीने केला आहे. या डॉक्यूमेंट्रीवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे.

या घटनेमुळे बीबीसी आणि केंद्र सरकार यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. या निमित्ताने इंदिरा गांधी या पंतप्रधान असताना त्यांनी देखील बीबीसीवर बंदी घातली होती. त्याची आठवण आज ताजी झाली आहे. 1970 साली भारताची प्रतिमा नकारात्मक पद्धतीने दाखवल्याने बीबीसीवर इंदिरा गांधी यांनी बंदी घातली होती. त्यावेळी फ्रेंच दिग्दर्शक लुई माले यांचा एक माहितीपट बीबीसीवर दाखवण्यात आला होता. यात भारताची प्रतिमा नकारात्मक दाखवल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे दोन वर्षासाठी बीबीसीवर भारतात बंदी घालण्यात आली होती.

यानंतर मार्च 2015 मध्ये बीबीसीने निर्भया प्रकरणातील दोषींवर डॉक्यूमेंट्री तयार केली होती. या डॉक्यूमेंट्रीवर देखील दिल्ली उच्च न्यायालयाने बंदी घातली होती. याआधी जून 2008 मध्ये देखील केंद्र सरकार व बीबीसी यांच्यात वाद झाले होते. बीबीसीने वर्कशॉपमध्ये काम करणाऱ्या मुलांचे पॅनोरमा शोमधील फुटेज दाखवले होते. यामध्ये बालमजुरीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप बीबीसीवर करण्यात आला होता. काही काळाने हा आरोप खोटा ठरला.

बीबीसीची स्थापना कधी झाली होती..

बीबीसीची स्थापना 18 ऑक्टोबर 1922 रोजी करण्यात आली आहे. या कंपनीचे नाव ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कंपनी असे होते. त्यानंतर ही कंपनी ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनमध्ये बदलली गेली. भारतामध्ये हिंदी, मराठी, बंगाली, तामिळ, गुजराती, तेलुगू, पंजाबी या भाषांमध्ये बीबीसी काम करते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube