बंगळुरू तिहेरी हत्याकांड; कौटुंबिक सन्मानाच्या नावाखाली तरुणाने आई-वडील आणि बहिणीची हत्या करत मृतदेह घरात पुरले
26 जानेवारी रोजी अमृता गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर अक्षयने तिला गर्भपात करण्यासाठी दबाव टाकला. मात्र, आई-वडिलांनी याला तीव्र विरोध केला आणि मुलीच्या बाजूने उभे राहिले.
Bengaluru Trippel Murder Case: बंगळुरूतील विजयनगर परिसरात घडलेल्या एका अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. एका तरुणाने स्वतःच्या आई, वडील आणि लहान बहिणीची निर्घृण हत्या करून त्यांचे मृतदेह घरातच पुरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 27 जानेवारी रोजी आरोपीने स्वतः पोलिसांसमोर शरणागती पत्करल्यानंतर या तिहेरी हत्येचा भयंकर उलगडा समोर आला.
कोट्टुरू भागात राहणारा अक्षय असं आरोपीचे नाव असून, पोलीस तपासात त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. बहिणीने लग्नाआधी गर्भधारणा केल्यामुळे आणि त्यामुळे आपल्या कुटुंबाच्या सन्मानाला धक्का बसल्याची भावना निर्माण झाल्यामुळे आपण हे कृत्य केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची 18 वर्षांची बहीण अमृता ही पीयूसीमध्ये शिक्षण घेत होती. ती तीन महिन्यांची गर्भवती असल्याची बाब काही दिवसांपूर्वी कुटुंबाच्या लक्षात आली होती. अमृताचे एका तरुणाशी प्रेमसंबंध होते आणि तो तरुण वेगळ्या समुदायातील असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. हाच मुद्दा आरोपीच्या रागाचे एक मोठे कारण ठरल्याचे तपासात समोर आले आहे.
चार महिन्यांपूर्वी अक्षयने बहिणीचा मोबाईल तपासला असता, ती एका तरुणाशी सातत्याने संपर्कात असल्याचे त्याला आढळले. त्याने त्या तरुणाशी थेट फोनवर बोलून जाब विचारला. प्रेमसंबंधांची खात्री होताच अक्षयने बहिणीला मारहाण करून तिला धमकावले. त्यावेळी अमृताने माफी मागून असे काही नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला.
मात्र 26 जानेवारी रोजी अमृता गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर अक्षयने तिला गर्भपात करण्यासाठी दबाव टाकला. मात्र, आई-वडिलांनी याला तीव्र विरोध केला आणि मुलीच्या बाजूने उभे राहिले. याच गोष्टीचा राग मनात धरून अक्षयने टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
तपासानुसार, 26 जानेवारी रोजी सकाळी अक्षयने आधी आईची हत्या केली. त्यानंतर त्याने आंघोळ करून रक्ताने माखलेले कपडे नष्ट केले. संध्याकाळी बहीण घरी परतल्यानंतर तिचाही खून करण्यात आला. पुन्हा एकदा त्याने स्वतःला स्वच्छ करून घेतले. रात्री दारू पिऊन घरी परतल्यावर, सोफ्यावर बसलेल्या वडिलांवर हल्ला करून त्यांचीही हत्या करण्यात आली.
तीनही मृतदेह एकाच खोलीत ठेवून ती खोली कुलूपबंद केली. दुसऱ्या दिवशी आरोपीने आई व बहिणीचे मोबाईल फोन घेऊन बंगळुरू गाठले. जयदेव रुग्णालय परिसरात काही फोटो काढून ते स्वत:च्या फोनवर पाठवले आणि नंतर दोन्ही मोबाईल कचऱ्यात फेकून दिले. आपला मोबाईल मात्र त्याने घरीच ठेवला होता.
यानंतर तो आपला काका वसंत यांना भेटला आणि संपूर्ण प्रकार त्यांना सांगितला. पोलीस तपासात असंही समोर आलं आहे की, काकांनीच मृतदेह पुरून कुटुंब बेपत्ता असल्याचा बनाव करण्याचा सल्ला दिला. 27 जानेवारीच्या रात्री अक्षयने टाइल्स कटर आणि ड्रिलिंग मशीनच्या मदतीने घरात खड्डा खणून तिन्ही मृतदेह पुरले.
29 जानेवारी रोजी आरोपी आणि त्याचा काका टिळकनगर पोलीस ठाण्यात गेले आणि आई-वडील व बहीण बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांना संशय आल्याने सखोल चौकशी करण्यात आली आणि अखेर हे तिहेरी हत्याकांड उघड झाले.
या प्रकरणी आरोपी अक्षय आणि त्याचा काका वसंत या दोघांनाही अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू असल्याचे बंगळुरू पोलिसांनी सांगितले आहे.
