मोठी बातमी: पुलवामाचं गुपित उघडणं भोवलं, सत्यपाल मलिकांना CBI चं समन्स
CBI notice on Satya Pal Malik: कथित भ्रष्टाचार प्रकरणी जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (SatyaPal Malik) यांना सीबीआयने (CBI) समन्स पाठवले आहे. त्यांना 27 आणि 28 एप्रिल रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. या माहितीला सीबीआयच्या अधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे.
सीबीआयने जम्मू-काश्मीरमधील दोन प्रकल्पांमधील अनियमिततेबाबत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी सीबीआयने त्यांना पाचारण केले आहे. दोन फायलींवर स्वाक्षरी करण्यासाठी आपल्याला ३०० कोटींची ऑफर मिळाल्याचा दावा मलिक यांनी केला होता. सीबीआयने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही त्यांची चौकशी केली होती.
सत्यपाल मलिक म्हणाले की, मी दिलेल्या अहवालाबाबत सीबीआयला काही स्पष्टीकरण हवे आहे. त्याचवेळी, पीटीआय या वृत्तसंस्थेने एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, विमा घोटाळ्याशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी सीबीआयने त्यांना नोटीस बजावली आहे.
दरम्यान, जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या पुलवामा हल्ल्याला केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार जबाबदार असल्याचे म्हटले होते. केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (CRPF) इतका मोठा ताफा रस्त्यावरून कधीच जात नाही. सुरक्षा दलांनी सैनिकांना घेऊन जाण्यासाठी विमानाची मागणी केली होती पण संरक्षण मंत्रालयाने ते नाकारले. त्यामुळे पुलवामा हल्ला हा विशेषत: सीआरपीएफ आणि गृह मंत्रालयाच्या अक्षमतेचा आणि निष्काळजीपणाचा परिणाम असल्याचा दावा माजी राज्यपालांनी केला होता.
मलिकांच्या या दाव्यामुळे आता देशातील राजकारण तापले होते. पंतप्रधान मोदींना भ्रष्टाचाराबद्दल राग नाही, असा दावा मलिक यांनी केला होता. याशिवाय पंतप्रधान मोदींना काश्मीरबाबत काहीच माहिती नसल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. ते म्हणाले, ‘पंतप्रधान काश्मीरबाबत संभ्रमात आहेत, त्यांना काश्मीरबाबत काहीच माहिती नाही.’