व्हायरल पत्र बनावट; केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याचा दावा खोटा
या पत्रातील दावा पूर्णपणे खोटा असल्याचं स्पष्ट झालं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी कोणताही राजीनामा दिलेला नाही.
सोशल मीडियावर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Pradhan) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा दिल्याचा दावा करणारे एक पत्र मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या पत्रात परीक्षा पेपरफुटीच्या घटना, विद्यार्थ्यांमधील वाढती नाराजी आणि आत्महत्यांच्या घटनांचा उल्लेख करत आपण नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच या परिस्थितीसाठी पंतप्रधानांनीही जबाबदारी स्वीकारावी, असा मजकूर पत्रात लिहिलेला दिसतो.
मात्र, या पत्रातील दावा पूर्णपणे खोटा असल्याचं स्पष्ट झालं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी कोणताही राजीनामा दिलेला नाही. केंद्र सरकारकडून किंवा शिक्षण मंत्रालयाकडून त्यांच्या राजीनाम्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तसंच राष्ट्रपती भवन किंवा पंतप्रधान कार्यालयाकडूनही अशा कोणत्याही राजीनाम्याची पुष्टी करण्यात आलेली नाही.
व्हायरल होत असलेल्या पत्रात शिक्षण मंत्रालयाचे लेटरहेड, स्वाक्षरी आणि अधिकृत स्वरूपाचा वापर करण्यात आला असला, तरी ते अधिकृत दस्तऐवज नसून दिशाभूल करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील अशा पोस्ट आणि पत्रांवर विश्वास ठेवण्यापूर्वी अधिकृत स्रोतांवरून माहितीची खातरजमा करणं आवश्यक आहे अशी चर्चा सुरू झाली आहे.
सध्या धर्मेंद्र प्रधान हे केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून आपल्या पदावर कार्यरत असून त्यांनी राजीनामा दिल्याची कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले हे पत्र आणि त्यासोबत केला जाणारा दावा पूर्णपणे फेक असून नागरिकांनी अशा अप्रमाणित माहितीचा प्रसार टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, दिल्लीत काल काँग्रेस नेते राहुल गांधी आणि अगोदरपासून जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनामुळं प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी वाढली आहे.