‘झुरळां’ची फौज संसदेच्या वाटेवर? ‘कॉक्रोच जनता पार्टी’ लढवणार लोकसभा निवडणूक..

cockroach janta party ज्यांना व्यवस्थेने 'झुरळ' म्हणून हिणवले, तेच आता लोकशाही वाचवण्यासाठी थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत

  • Written By: Published:
'झुरळां'ची फौज संसदेच्या वाटेवर? 'कॉक्रोच जनता पार्टी' लढवणार लोकसभा निवडणूक..

Abhijeet Dipke On Cockroach Janta Party Future Plans :  काही बेरोजगार तरुण व्यवस्थेवर झुरळांप्रमाणे हल्ला करतात” या सरन्यायाधीशांच्या एका विधानाने देशात असं काही राजकीय वादळ उठेल, याची कल्पना कदाचित कोणीच केली नव्हती. या विधानाचा निषेध म्हणून जन्माला आलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ने (CJP) आता थेट देशाच्या सत्तेला आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे. अवघ्या ४ दिवसांत कोट्यवधी लोकांचा पाठिंबा मिळवणारी ही डिजिटल चळवळ आता थेट राजकीय पक्षात रूपांतरित होऊन निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार का? यावर पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी मोठी घोषणा केली असून, त्यांचा ‘प्लॅन २०२९’ आता समोर आला आहे.

निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार का? अभिजीत दीपके यांचे थेट भाष्य

‘कॉक्रोच जनता पार्टी’ भविष्यात निवडणूक लढवणार का? या प्रश्नाला उत्तर देताना अभिजीत दीपके यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना सकारात्मक संकेत दिले आहेत. “नक्कीच होईल, पण आत्ताच त्याबाबत ठामपणे सांगणं थोडं अवघड आहे. कारण, ही कॉक्रोच जनता पार्टी आम्ही कोणतंही नियोजन करून सुरू केलेली नव्हती. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी ते वक्तव्य केलं नसतं, तर कदाचित आज हे घडलंही नसतं.” असे अभिजीत दीपके यांनी सांगितलं. आम्ही कोणताही प्लॅन केला नव्हता, मात्र अवघ्या ३ ते ४ दिवसांत १ कोटी १० लाखांपेक्षा जास्त लोकांनी आम्हाला फॉलो केले आहे, तर २० लाखांहून अधिक सदस्य यात सामील झाले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांचा पाठिंबा मिळाल्यामुळे पुढील दिशा ठरवणे हे एक मोठे आव्हान आहे.

मिशन २०२९’ आणि ५ कलमी अजेंडा

‘कॉक्रोच जनता पार्टी’ने सोशल मीडियावर (X – पूर्वीचे ट्विटर) #CJP2029 या हॅशटॅगसह २०२९ च्या लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून आपला ‘५ कलमी अजेंडा’ जाहीर केला आहे. पक्षाने अधिकृत पोस्टमध्ये म्हटले आहे की, “आम्ही सर्व विरोधी पक्षांचे नेते, त्यांचे समर्थक आणि सामाजिक कार्यकर्त्यांना आमच्या या ५ कलमी अजेंड्याला पाठिंबा देण्याचे आवाहन करतो. तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात (भाजप वगळता) याने आम्हाला फरक पडत नाही; जर तुम्हाला लोकशाही वाचवायची असेल, तर #CJP2029 ला पाठिंबा द्या.”

व्यवस्थेवर आणि सरकारवर जनतेचा राग का?

अभिजीत दीपके यांच्या मते, या चळवळीला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद हा जनतेच्या मनातील असंतोष दर्शवतो. “लोकांचं म्हणणं हेच आहे की कोणतंही सरकार आमचं काहीही ऐकायला तयार नाही. आमच्या समस्या काय आहेत, हे समजून घ्यायला कोणीच तयार नाही. इतर राजकीय पक्षांनी ज्या चुका केल्या, त्या आम्हाला करायच्या नाहीत. आम्हाला लोकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करायचे नाही,” असे दीपके म्हणाले.

पुढील पाऊल काय असेल?

दीपके यांनी स्पष्ट केले की, ते लवकरच या कोट्यवधी लोकांच्या भावना जाणून घेणार आहेत, त्यांची मते घेणार आहेत आणि लोकांचा सध्याच्या व्यवस्थेवर एवढा राग का आहे, याची कारणे शोधून पुढील राजकीय रणनीती आखणार आहेत. त्यामुळे डिजिटल विश्वातून उपरोधात्मक रितीने सुरू झालेली ‘झुरळांची’ ही फौज आता २०२९ मध्ये देशाच्या सत्तेला आव्हान देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे भविष्यात ही ‘कॉक्रोच जनता पार्टी’ प्रस्थापित राजकीय पक्षांना कितपत भारी पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

follow us