ग्रामीण एलपीजी ग्राहकांना मोठा दिलासा; सिलेंडर बुकिंग 45 दिवसांची अट केली कमी

एलपीजीवरील दबाव कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून पाइप्ड नॅचरल गॅस म्हणजेच PNG कनेक्शनच्या विस्तारावरही भर देण्यात आला आहे.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 09 07T191938.755

केंद्र सरकारने ग्रामीण भागातील एलपीजी (LPG) ग्राहकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागात एलपीजी सिलेंडरच्या रिफिल बुकिंगसाठी असलेली 45 दिवसांची अट आता कमी करून 25 दिवस करण्यात आली आहे. त्यामुळे शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण ग्राहकांनाही 25 दिवसांनंतर पुन्हा सिलेंडर बुक करता येणार आहे.

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी या निर्णयाची माहिती दिली. अमेरिका आणि इराणमधील संघर्षाच्या काळात एलपीजीचा पुरवठा आणि मागणी यांच्यात समतोल राखण्यासाठी ग्रामीण ग्राहकांसाठी 45 दिवसांची बुकिंग मर्यादा लागू करण्यात आली होती. त्यावेळी शहरी ग्राहकांना मात्र 25 दिवसांनंतर सिलेंडर बुक करण्याची परवानगी होती.

आता देशातील एलपीजी पुरवठ्याची परिस्थिती सुधारली असून सिलेंडर रिफिलचा अनुशेषही कमी झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी लागू असलेली 45 दिवसांची अट हटवून ती 25 दिवसांवर आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे विशेषतः नियमितपणे एलपीजीचा वापर करणाऱ्या ग्रामीण कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सलग सात वेळा दरवाढीनंतर अखेर दिलासा; व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत मोठी घट

पेट्रोलियम मंत्रालयाने 7 सप्टेंबर रोजी इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमच्या चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालकांना यासंदर्भात पत्र पाठवले आहे. एलपीजीच्या पुरवठ्यात वाढ झाल्याने आणि रिफिल उपलब्धतेची स्थिती सुधारल्याने ग्रामीण भागातील बुकिंग कालावधी 25 दिवस करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या निर्णयाचा थेट परिणाम सिलेंडर बुकिंगच्या वेळेवर होणार आहे. उदाहरणार्थ, एखाद्या ग्रामीण ग्राहकाने 1 तारखेला सिलेंडर बुक केला असेल तर पुढील सिलेंडरसाठी त्याला 25 दिवस पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच 26 तारखेपासून बुकिंग करता येईल. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील ग्राहकांसाठी सिलेंडर बुकिंगची अट आता समान झाली आहे.

दरम्यान, एलपीजीवरील दबाव कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून पाइप्ड नॅचरल गॅस म्हणजेच PNG कनेक्शनच्या विस्तारावरही भर देण्यात आला आहे. काही शहरांमध्ये PNG आणि LPG दोन्ही कनेक्शन असलेल्या ग्राहकांना LPG कनेक्शन सरेंडर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, ग्रामीण ग्राहकांसाठी 25 दिवसांची बुकिंग मर्यादा लागू करण्याच्या निर्णयामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

follow us