योगींविरोधातील वणव्याला अमित शहांची काडी? उत्तर प्रदेशातील राड्याची Inside Story
उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपला (BJP) पराभवाचा सामना करावा लागला. तेव्हापासून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Aditynath) यांच्याविरोधात पक्षात कुजबूज सुरू झाली होती. पण आता उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य (Keshvprasad Mourya) यांनी जाहीरपणे योगीविरोधात सूर आळवण्यास सुरुवात केली आहे. अशात भुपेंद्र यादव यांनीही प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा सादर केला आहे. त्यामुळे पक्षात सर्व काही अलबेल नाही हे स्पष्ट आहे. ‘यूपी’चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात पक्षांतर्गत आवाजाला धार येऊ लागली आहे. योगींना दिल्लीत पाठविण्याची चर्चा सुरू झाली आहे. पण विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांची उचलबांगडी होण्याची शक्यता कमीच असल्याचे जाणकार सांगतात. (Deputy Chief Minister Keshav Prasad Maurya has publicly opened a march against Yogi Adityanath.)
मात्र या आठवड्यात उत्तर प्रदेश भाजपची विशेष कार्यकारिणीची बैठक लखनौत झाली. त्यातील चर्चेत योगी आदित्यनाथांबद्दल भाजपमध्ये फूट पडल्याचे प्रकर्षाने दिसले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत पराभवासाठी कारणीभूत घटकांवर विचारमंथन होणे अपेक्षित होते. पण चर्चेअंती ‘योगीसमर्थक’ आणि ‘योगीविरोधक’ अशी फूट पक्षात पडल्याचे चित्र होते. दबक्या आवाजत योगींविरोधात भडकलेल्या या वणव्याला केंद्रीय मंत्री अमित शाह यांनीच काडी लावली असल्याचे बोलले जात आहे. नेमके असे का बोलले जात आहे? काय आहे राजकारण? पाहुया सविस्तर…
पिचड, लहामटे चितपट होणार? शरद पवारांनी ‘अमित भांगरेंना’ दिली ताकद
खरंतर लोकसभेसाठी भाजपचे व्यूहरचनाकार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा होते, हे सर्वश्रुत आहे. तरी पक्षातील एक गट आता सारे खापर योगींवर फोडण्याचा प्रयत्न करत आहे. दिल्लीत बसलेल्या पक्षातील काही बड्या नेत्यांचा आशीर्वादाने हे सुरु असल्याचे बोलले जात आहे. जे केशवप्रसाद मोर्य 2017 पासून योगी आदित्यनाथ यांच्यावर खार खाऊन आहेत त्यांचाच वापर यासाठी केल्याचे दिसून येत आहे. 2017 मध्ये प्रदेशाध्यक्ष असलेल्या मोर्य यांना डावलून भाजपने योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री बनवले. तेव्हापासूनच ते संधीच्या शोधात होते. यंदा मोर्य यांना संधी दिसली ती लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या कामगिरीनंतर.
मात्र राजकीय जाणकारांनी नोंदविलेल्या निरीक्षणानुसार, दिल्लीतील बड्या नेत्यांनी निवडलेल्या अनेक उमेदवारांबाबत मुख्यमंत्र्यांनी नोंदविलेले मत दुर्लक्षित करण्यात आले. केंद्रीय प्रचार समितीच्या प्रसिद्धी साहित्य आणि फलकांवरील फोटोंमधून योगी गायब होते. संपूर्ण निवडणूक मोदी आणि ‘मोदी की गॅरंटी’ या नावाने लढवली गेली. पण नंतर अमित शहा यांच्याशी घनिष्ठ संबंध असलेल्या पत्रकाराने एका हिंदी वृत्तपत्रात लेख लिहिला आणि याच लेखाचा आधार घेत भाजपच्या खराब कामगिरीला योगी आदित्यनाथ यांना जबाबदार धरण्याची मोहीम नियोजनबद्धपणे सुरू करण्यात आली. पक्षाच्या दोन आमदारांनी यासंदर्भात केलेल्या विधानांतून योगीविरोधी मोहिमेला दुजोरा मिळतो.
25 जुलैपासून आरक्षण बचाव यात्रा काढणार, ओबीसींसाठी प्रकाश आंबेडकर मैदानात
बादलपूर मतदारसंघातील भाजपचे आमदार रमेशचंद्र मिश्रा यांनी एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. भाजपला 2027 ची निवडणूक जिंक कसे अशक्य आहे, हे त्यात सांगितले आहे. त्यावेळी मोठा पराभव टाळण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आवाहन मिश्रा यांनी पक्षनेतृत्वाला केले आहे. भाजपचे दुसरे आमदार आणि माजी मंत्री मोतीसिंह यांनी राज्य सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत योगींच्या कामाच्या पद्धतीवर जोरदार आक्षेप घेतला. विशेष म्हणजे राज्य कार्यकारिणीच्या बैठकीच्या एक दिवस आधीच या दोन्ही आमदारांनी योगींविरोधी मतप्रदर्शन केले. ही बैठक भाजपचे वरिष्ठ नेते व राष्ट्रीय सरचिटणीस बी.एल. संतोष यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. संतोष यांची पाळेमुळे ‘आरएसएस’शी जोडलेली असून ते मोदी- शहांचे ते निकटवर्तीय समजले जातात. संतोष यांच्या ‘बंद दाराआड झालेल्या बैठकीत भाजपचे योगीविरोधी नेतेही सहभागी झाले होते.
या सगळ्या राड्यानंतरही राजकीय वर्चस्व सिद्ध करण्याची आणखी एक संधी भाजप नेतृत्व योगींना देणार असल्याचेही बोलले जात आहे आणि राज्यात होणाऱ्या दहा विधानसभा मतदारसंघांतील आगामी पोटनिवडणुकीत योगींची कामगिरी कशी असेल, यावर बरेच काही अवलंबून आहे. दहापैकी नऊ मतदारसंघातील आमदार लोकसभेत निवडून गेल्याने या जागा रिक्त झाल्या आहेत. समाजवादी पक्षाचे (सप) मदार इरफान सोलंकी यांना फौजदारी गुन्ह्यात शिक्षा झाल्याने ते अपात्र ठरले आहेत. त्यामुळे त्यांची जागा रिक्त झाली आहे.